दलित, रिपब्लिकन, आंबेडकरी, बुद्धिजीवी कार्यकर्त्यांच्या विचार बैठकीतील निर्णय
धुळे : केंद्रातील मोदी सरकारकडून संविधान कुरतडल जात आहे. संविधान बाजूला ठेवून जनतेवर निर्णय थोपवले जात आहे.संविधानच राहिले नाही तर देशातील महापुरुषांचे पुतळे राहतील की नाही याची काळजी वाटते. मुस्लीमांची स्थिती दुय्यम नागरीकांची करुन ठेवली आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी दलीत, रिपब्लीकन,आंबेडकरवादी,,बुध्दीजीवी आणि चळवळीशी जोडले गेलेल्या मंचाने धुळ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना पाठींबा दिला असल्याची माहिती प्रा. बाबा हातेकर यांनी दिली.
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आज सकाळी ११ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत हरिश्चंद्र लोंढे, प्रा.अनिल दामोदर, अॅड.सुरेश बागले, राहुल वाघ, किरण गायकवाड,प्रभाकर खंडारे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. बाबा हातेकर म्हणाले की, शनिवार दि. ११ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता संदेश भुमी येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर दलीत, रिपब्लीकन, आंबेडकरवादी, वकील, डॉक्टर, प्राध्यापक व बुध्दीजीवी आणि आंबेडकरी चळवळीशी जोडलेल्या कार्यकर्त्यांची एक विचारसभा आयोजीत करण्यात आली होती. या विचार सभेत भारताचे संविधान व संरक्षण हा चिंतेचा विषय असल्याचे म्हटले गेले. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी कोणाला आणि कसे रोखायचे यावर मंथन झाले.
२०१४ ते २०२४ या काळात देशाची सत्ता भाजपच्या हातात आहे. या दहा वर्षात गरीबांची पिळवणूक,दलीत,वंचीत ,आंबेडकरी जनता, एससी,एसटी, ओबीसींचे शोषण झाले आहे. आणखी पाच वर्ष भाजप सत्तास्थानी राहीले तर भारताचे डॉ.आंबेडकर लिखीत संविधान पूर्णतः रद्द केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एव्हढेच नव्हेतर कदाचीत २०२४ निवडणुक ही शेवटची ठरू शकते म्हणून भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी धुळे लोकसभा मतदार संघात इंडिया आघाडीच्या उमेदवार डॉ.शोभा बच्छाव यांना पाठींबा देण्याचे ठरविले. त्यानुसार आम्ही इंडिया आघाडीच्या उमेदवार डॉ.बच्छाव यांना पाठींबा देत असल्याचे प्रा. हातेकर यांनी सांगितले.