भाजपला सत्तेवरून खेचण्यासाठी सत्यशोधक, लालबावट्याच्या प्रबोधन सभा
धुळे : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे पुन्हा सरकार आले तर संविधानाला धोका असल्याने भाजपाला सत्तेवरून खाली खेचणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे आम्ही इंडिया आघाडीला पाठिंबा दिला आहे, असे स्पष्ट करत सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि लालबावटा यांच्यासह डाव्या आघाडीच्या विविध पक्ष संघटनांनी धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रबोधनपर सभा घेतल्याची माहिती कॉम्रेड किशोर ढमाले यांनी दिली.
देशातील निवडणूक आता जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे भाजप सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागेल. नंदुरबार आाणि धुळ्यात इंडिया आघाडीचा विजय
निश्चित असल्याचा दावा सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. किशोर ढमाले यांनी केला आहे. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या साक्री रोडवरील पत्रकार भवनाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या पत्रकार परिषदेला कॉ. यशवंत मालचे, सुरेश मोरे, सुभाष काकुस्ते, एल. आर. राव, वसंत पाटील, पोपटराव चौधरी आणि काँग्रेसचे दरबारसिंग गिरासे उपस्थित होते.
सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष आणि लाल बावट्याने इंडिया आघाडीला पाठींबा दिला असून, धुळ्यात महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्यासाठी आजपर्यत सात सभा सत्यशोधकने घेतल्या आहेत. मोघन, उभंड, दुसानेसह अनेक गावांमध्ये सभा घेत सक्रिय पाठींबा दिला आहे. साल्हेर हे गाव खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दत्तक घेतले होते. परंतु त्या गावाची अवस्था अत्यंत वाईट आहे. कोणतीही विकासकमे नाहीत. ते साल्हेरला फिरकलेही नाहीत. त्यांच्या विरोधात जनतेत असंतोष आहे.
या निवडणुकीत दलीत, मुस्लीम, आदिवासी, शेतकर्यांनी एकजुट केली आहे. मणिपूरध्ये अत्याचार सुरुच आहे. महिलांची नग्न धिंड काढली गेली. त्यात भाजपचा हात होता. मोदी आणि शहांनी देशात गृहयुध्द लादले आहे.
2014 मध्ये मोदी सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करण्याचा वादा केला होता. परंतु 2015 मध्ये सुप्रिम कोर्टात शपथपत्र दाखल करत आयोगाच्या शिफारशी स्वीकारु शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत.
नंदुरबारध्ये जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला असून, धुळ्यातही ती स्थिती आहे. तीन टप्प्यात झालेल्या मतदानाच्यावेळी राम मंदिराचा मुद्दा भाजप 25 टक्के वापरत होते. परंतु त्यांचा तोल ढासळला. निकालाच्या दिवशी म्हणजेच 4 जूनला काही गडबड झाली तर सहा जूनला आणिबाणी लागू शकते, अशी भितीही ढाले यांनी व्यक्त केली.