धुळे लोकसभा मतदारसंघात अंदाजे 55.96 मतदान
धुळे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात धुळे लोकसभा मतदार संघात अंदाजे सरासरी 55.96 टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.
विधानसभा मतदार संघनिहाय मतदानाची टक्केवारी अशी : धुळे ग्रामीण : 50.31 टक्के धुळे शहर : 46.16 टक्के शिंदखेडा : 45.84 टक्के मालेगांव मध्य : 57.02 टक्के मालेगांव बाहृय-47.00 टक्के बागलाण-47.01 टक्के
तालुक्यातील मोरडदांडा या शंभर टक्के बंजारा समाजाची वस्ती असलेल्या गावात एका नवरदेवाने आणि 90 वर्षांच्या वयोवृद्ध आजीबाईंनी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी धुळे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. मतदार संघात मतदारांचा उत्साह पाहायला मिळत आहे.
नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क : मोरदड तांडा गावातील एका मतदान केंद्रात आकाश चंद्रभान चव्हाण यांनी लग्न लागण्याच्या आधी मंडपातून पायी चालत थेट मतदान केंद्र गाठले आणि मतदारांचे लक्ष वेधून घेतले. मतदानाचा हक्क बजाल्यानंतर बोहल्यावर चढलेल्या नवरदेवाचे गावकऱ्यांनी तोंडभरून कौतुक केले.
90 वर्षांच्या आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क : मोरदड तांडा गावातच जनीबाई राठोड या 90 वर्षांच्या वयोवृद्ध आजीबाईंनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना मतदान केंद्रापर्यंत उचलून नेले. नवरदेव आणि आजीबाईंनी मतदान केल्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिकांसह तरूणांनी त्यांच्यासोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आणि मतदान करण्याचे आवाहन केले. सामाजिक कार्यकर्त्यांनी नवरदेवासह आजीबाईंचे स्वागत केले. त्यात राजू पवार, रवींद्र राठोड, राजाराम राठोड, अनिल पवार, अशोक राठोड, राजेंद्र पवार, अनिल चव्हाण, दादाभाऊ राठोड, नवल पवार, अजित राठोड, वाल्मिक राठोड आदी उपस्थित होते.
वृध्दाश्रम आतील आजी-आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क : धुळे शहरातील मातोश्री वृद्धाश्रमातील 23 आजी-आजोबांनी 15 वर्षानंतर प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावला. यासाठी बीएलओ दिनेश सैंदाणे यांनी निवडणूक ओळखपत्र काढण्यापासून ते मतदान करेपर्यंत आवश्यक ती मदत केली. राज्यातील विविध भागातून धुळ्याच्या वृद्धाश्रमात दाखल झालेले आजी-आजोबांचे धुळ्यात मतदार यादीमध्ये नाव नव्हते. त्यामुळे त्यांना मतदान करता येत नव्हते. यंदा प्रशासनाने या आजी-आजोबांची धुळे जिल्ह्यात मतदार नोंदणी करून घेतली आणि तब्बल पंधरा वर्षानंतर त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला. त्यामुळे या आजी आजोबांनी समाधान व्यक्त केले आहे.