नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक, ॲड. महेंद्र भावसार यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी?
धुळे : वकिलीच्या माध्यमातून नाशिक विभागासह राज्यातील हजारो शिक्षकांना न्याय मिळवून देणारे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. महेंद्र भावसार यांना नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) उमेदवारी मिळू शकते, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. ॲड. भावसार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी मागितली असल्याचे बोलले जात आहे.
पक्षश्रेष्ठींचा सकारात्मक प्रतिसाद : शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानपरिषदेमध्ये शिक्षकांचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा व्यक्त करीत ॲड. महेंद्र भावसार यांनी याआधीच नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून आपली उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली होती. तसेच परवा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचीही त्यांनी भेट घेतली. ॲड. महेंद्र भावसार यांनी आतापर्यंत शिक्षकांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ॲड. भावसार यांना राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी मिळेल असे मानले जात आहे. तसेच ॲड. महेंद्र भावसार यांचे सुपुत्र सारांश भावसार हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून यशस्वीरित्या राज्यात काम करीत आहेत. त्यामुळे ॲड. भावसार यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
शिक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद : आपल्या उमेदवारीला नाशिक विभागातील शिक्षकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचा दावा ॲड. महेंद्र भावसार यांनी केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी शिक्षकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर येथील शिक्षकांशी चर्चा करून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
ॲड. महेंद्र भावसार यांची भूमिका : शिक्षण क्षेत्रात कशा प्रकारे शिक्षकांवर अन्याय केला जातो? शिक्षकांची काही चूक नसतानाही त्यांना कसे कायदेशीर बाबींमध्ये अडकविले जाते? याबाबत ॲड. भावसार यांचा पूर्ण अभ्यास असून, अशा प्रकारच्या अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे. कायद्यात कोणत्या त्रुटी आहेत आणि कायद्यातील कोणत्या कलमात कोणती दुरुस्ती केल्यामुळे शिक्षकांवरील अन्याय दूर होईल, या विषयावर ॲड. भावसार यांनी अभ्यासपूर्ण प्रबंध लिहिला असून, तो शासनाला सादर केला आहे. परंतु त्यानंतरही या दुरुस्तीबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
ॲड. भावसार म्हणतात, वकिली क्षेत्रात आणि कायद्यात राहून शिक्षकांसाठी न्याय मिळविण्याचे कामकाज ३२ वर्षे केल्यानंतर असे निदर्शनास येते की, मूलभूत कायद्यातच काही बदल आवश्यक आहेत. तसेच कायदा बदलण्याचे काम हे न्यायव्यवस्थेचे नाही तर ते संसदेचे अथवा विधानभवनाचे आहे. म्हणूनच शिक्षकांवरील अन्याय मुळापासून दूर करण्यासाठी विधानभवनात प्रवेश करून कायद्याचे मूलभूत बदल घडवून आणावे, या उद्देशाने शिक्षक मतदार संघाची निवडणूक लढविण्याचा माझा निर्णय आहे. यासाठीच राजकारणात प्रवेश करीत असल्याचे ॲड. महेंद्र भावसार यांनी स्पष्ट केले.