सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?
धुळे : तालुक्यातील सोनगीर विद्याप्रसारक मंडळ संचलित एन. जी. बागुल कन्या विद्यालयातील उपशिक्षिकेने मुख्याध्यापक पदाची बनावट कागदपत्रे व शिक्के तयार करून सेवानिवृत्त शिक्षकांना जास्तीची पेन्शन व ग्रॅज्युईटी रक्कम सुमारे सव्वा ते दीड कोटी रुपयांचा खोटा व बनावट प्रस्ताव तयार करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत मुख्याध्यापक हेमकांत शंकर विसपुते यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणात धुळे जिल्हा न्यायालयाने संशयित आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. असे असताना संशयित आरोपी मोकाट फिरत आहे. एप्रिल महिन्यात गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत पोलिसांनी काहीही हालचाल केलेली नाही. म्हणून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाला आहे. आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी होत आहे.
सोनगीर येथील एन. जी. बागुल कन्या विद्यालयात कार्यरत उपशिक्षिका सुनीता अमृतलाल चौधरी, सेवानिवृत्त उपशिक्षक राजेंद्र पंडित चौधरी, लोटन भटू चौधरी, भारती पंडित देशमुख, राजेंद्र मुरलीधर कोठावदे, लिपिक प्रकाश पुनमचंद गुजर, शिपाई दगडू शामराव बोरसे, तत्कालीन मुख्याध्यापक अमृत केशव कासार यांच्यावर शासनाची आर्थिक फसवणूक प्रकरणी एप्रिल महिन्यात भादंवि कलम 420, 465, 466, 467, 471, 34 अन्वये सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, धुळे जिल्हा न्यायालयाने संशयित आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. असे असताना त्यांना अद्याप अटक झालेली नाही. म्हणून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावे आणि संशयित आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी होत आहे.