योगेशआप्पा ईशी : राजकारण-समाजकारणातील एक दमदार नाव
शालेय जीवनापासूनच समाजसेवेची आवड असल्याने आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी कार्य करतानाच विकासाला हातभार लावणारे तरुण-तडफदार, हरहुन्नरी, होतकरू जनसेवक योगेशआप्पा ईशी यांचा जन्मदिवस आज त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसत आहेत. राजकारण-समाजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तरुण पिढीसाठी आदर्श ठरतील, अशी जी काही बोटावर मोजण्याइतकी मंडळी धुळे शहरात आहे, त्यात योगेशआप्पा ईशी यांचे नाव अव्वल स्थानी घेतले जाते.
तरुणपणापासूनच समाजकार्याचा ध्यास घेतलेले आप्पासाहेब योगेश ईशी समाजातील वंचित, पीडित, शोषित, दलित, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांच्या न्याय हक्कांसाठी सतत लढताना दिसतात. एवढेच नव्हे तर गव्हर्नर्मेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या विकासकामांमध्ये त्यांचा खारीचा वाटा आहे. योगेशआप्पा ईशी यांच्या समाजकार्याची आणि त्यांच्या कुटुंबाची समाजाप्रती असलेल्या आपुलकीची दखल घेत धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 मधील जनतेने आप्पासाहेबांच्या मातोश्री सुशीलाताई ईशी यांना नगरसेविका म्हणून काम करण्याची संधी दिली. सन 2014 मध्ये सुशीलाताई ईशी बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर प्रचंड बहुमताने निवडून आल्या. त्यानंतर योगेशआप्पा ईशी आणि सुशीलाताईंनी केलेल्या विकासकामांमुळे प्रभाग क्रमांक 15 मधील जनतेने सन 2019 च्या निवडणुकीत त्यांना पुन्हा विजयी केले. आपल्या प्रभागात प्रशस्त रस्ते, गटारी, मोकळ्या भूखंडांचा विकास, उद्याने, ओपन जिम, नियमित स्वच्छता, मंदिरांचा विकास अशी लांबलचक यादी न संपणारी आहे. योगेशआप्पा ईशी आणि नगरसेविका सुशीलाताई यांनी आपल्या प्रभागात केलेल्या विकासकामांमुळे धुळे शहरात या प्रभागाचा वेगळा ठसा उमटविला आहे. एवढेच नव्हे तर धुळे जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यपदी त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे धुळे जिल्ह्याच्या विकासात योगेशआप्पा आणि मातोश्री सुशीलाताईंचे योगदान नाकारता येणार नाही.
आंबेडकरी चळवळीत संघर्षातून पुढे आलेले योगेशआप्पा ईशी हे बहुजन समाज पार्टीचे निष्ठावान पदाधिकारी आहेत. पक्षाच्या नेत्या बहन मायावतीजी यांच्या नेतृत्वाखाली एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरू झालेला योगेशआप्पांचा प्रवास आता तरुण-तडफदार नेत्यापर्यंत येऊन ठेपला आहे. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत योगेशआप्पांनी बसपातर्फे उमेदवारी करीत प्रस्थापितांना घाम फोडला होता आणि ते तीन नंबरवर होते. बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून सामान्यांचे प्रश्न सोडवितानाच त्यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आपला प्रवास सुरू ठेवला आहे. बाबासाहेब म्हणाले होते, “शासनकर्ती जमात बना”, बाबासाहेबांच्या या आदेशानुसार योगेशआप्पा बाबासाहेबांचा विकासाचा गाडा पुढे हाकणाऱ्यांमध्ये आघाडीवर दिसतात.
सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महानगरपालिकेत शासनकर्ते झालेले योगेशआप्पांचे कुटुंब आजही जमिनीवरच आहे. प्रभाग क्रमांक 15 मध्ये अतिशय साध्या घरात राहणाऱ्या ईशी परिवाराला गरीब कष्टकऱ्यांच्या समस्यांची जाणीव आहे. म्हणूनच कोरोना काळात प्रस्थापित मंडळी जीव मुठीत घेऊन घरात बसली असताना योगेशआप्पांचे संपूर्ण कुटुंब जवळपास पंधराशे ते दोन हजार गरीब गरजू कुटुंबांना दोन वेळचे जेवण घरपोच देताना आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे. कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे कामधंदे बंद असताना योगेशआप्पांच्या दानधर्मामुळे हजारो कुटुंबांच्या घरात चूल पेटत होती.
आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून आपल्या समाजकार्याला सुरुवात करणाऱ्या योगेशआप्पांनी सर्वांसाठी काम केले आहे. दलित असो अथवा इतर कोणताही समाज, त्यांच्यावर अन्याय होत असेल तर आप्पासाहेब धावून जातात. त्यांच्या समस्या सोडवितात. रुग्णांना मदतीसाठी धाऊन जातात. अडल्यानडल्याच्या कामात येतात. त्यामुळे सर्वांना चालणारा नेता म्हणून त्यांची धुळे शहरात ओळख आहे. केवळ दलित समाजातच नव्हे तर धुळे शहराच्या राजकारणात त्यांनी आपला आगळावेगळा ठसा उमटविला आहे. आगामी निवडणुकांमध्ये देखील त्यांचा हा ठसा अधिकाधिक वृद्धिंगत होवो, याच योगेशआप्पांना जन्मदिनाच्या शुभेच्छा..!