आमदार जयकुमार रावल यांनी तरुणांवर केले खोटे गुन्हे दाखल
धुळे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिंदखेडा तालुक्यात राजकारण चांगलेच तापू लागले आहे. आमदार जयकुमार रावल यांनी वायपूर येथील तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा गंभीर आरोप श्यामकांत सनेर, कामराज निकम, संदीप बेडसे यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षांनी केला. वायपूर येथील घटनेची सखोल चौकशी करून खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे विधानसभेचे इच्छुक उमेदवार कामराज जगदीश निकम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिंदखेडा विधानसभा क्षेत्रात गेल्या वीस दिवसांपासून पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी फिरत असताना लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. परंतु स्थानिक आमदार जयकुमार रावल यांनी पुन्हा आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे कटकारस्थान सुरू केले आहे. हाफ मर्डर, दरोडा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. परवा वायपूर या गावात कामराज निकम यांना तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यामुळे स्थानिक आमदारांनी एका दाम्पत्याच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूराव केशव पाटील, योगेश पाटील, राकेश पतंग पाटील, भरत जयदेव पाटील, पतंग हसरत पाटील, हरकलाल जयदेव पाटील, भाऊराव जयदेव पाटील, सौरभ भाऊराव पाटील, गणेश भरत पाटील या कार्यकर्त्यांवर दरोड्यासारखा मोठा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणातील फिर्यादी दत्तात्रय बाबुलाल पाटील हे आमदार जयकुमार रावल यांच्या संस्थेत नोकरीला आहेत. त्यामुळे फिर्यादीवर दबाव आणून राजकीय द्वेषापोटी खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खोटे गुन्हे दाखल केल्यामुळे सदर तरुणांचे शैक्षणिक व इतर मोठे नुकसान होऊ शकते, असे निवेदनात म्हटले आहे. यापूर्वीही याच स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम आमदार जयकुमार रावल यांच्यामार्फत शिंदखेडा तालुक्यात करण्यात आले आहे. त्यामुळे घटनेची सखोल चौकशी केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल करू नयेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर जितेंद्र मराठे, भरत राजपूत, डॉ. नितीन चौधरी यांच्याही सह्या आहेत.
शिंदखेडा तालुक्याचे राजकारण : भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार रावल यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले कामराज निकम यांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदखेडा तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. विधानसभा निवडणुकीत थेट आमदार रावल यांना टक्कर देण्यासाठी कामराज निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील राजकारणाची समीकरणे तेव्हापासून बदलली आहेत. परंतु महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिंदखेडाची जागा कोणत्या पक्षाला जाते आणि नेमकं कोणाला तिकीट मिळतं? यावर जय-पराजयाची गणितं मांडता येणार आहेत.