इंदिरा उद्यान, छत्रपती संभाजी महाराज चौकाचा चेहरामोहरा बदलणार
धुळे : छत्रपती संभाजी महाराज चौक इंदिरा उद्यान सुशोभीकरणासह आनंद नगर येथे पोलीस चौकी, अभ्यासिका विविध विकासकामांचा पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी झालेल्या या कार्यक्रमाला भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. महापौर असताना प्रतिभाताई चौधरी यांनी ही कामे मंजूर केली होती.
देवपूरातील नागरिकांसाठी असलेली अत्यावश्यक कामे व शहराचे सौंदर्य यांचा विचार करून माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या लोकाभिमुख कामांचा शुभारंभ स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर माझ्या हस्ते होत आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी केले.
धुळे महापालिका हद्दीत विशेषत: देवपूर भागातील विकास कामांचा अनुशेष भरण्यासाठी मुलभूत सोयी-सुविधा योजनेअंतर्गत महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी १० कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला होता. या निधीतून विविध विकासकामे करण्यात येणार असून, यामुळे निश्चितच धुळे शहराच्या सौदर्यात आणि विकासात भर पडणार आहे. याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री गिरीष महाजन, महामंत्री विजय चौधरी यांच्यासह सर्वच नेते मंडळी यांचे सहकार्य लाभले होते. त्याचाच एक भाग म्हणून भव्य विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी सांगितले की, धुळे महानगरातील देवपूरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, इंदिरा उद्यान चौक यापूर्वी सन २०११ मध्ये मी प्रभाग क्रमांक १५ ची नगरसेविका असताना विकसित केला होता. त्यावेळी उद्यानाची भिंत मागे सरकवून आज दिसत असलेला ८० फुटाचा मोठा रस्ता करण्यात आला. या कामास तत्कालीन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी १५ लखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. सध्या असलेली उद्यानाची भिंत नव्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांप्रमाणे तयार केली जाणार आहे. तसेच प्रमुख रस्त्यावर पाण्याचे कारंजे बसवणे, लाईट, दुभाजक इत्यादी कामे होणार आहेत. तसेच नुकतेच इंदिरा उद्यान येथे २० लाखाचे राजमाता जिजाऊ सभामंडपाचे काम माझ्या स्थानिक निधीतून पूर्ण करण्यात येत आहे.
तसेच इंदिरा उद्यान परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये, खाजगी कोचिंग क्लासेस असल्याने येथे चौकात कायम वर्दळ असते. वाहतुकीची अडचण निर्माण होत असते. याठिकाणी टवाळखोर मुले सदर परिसरात फिरत असतात. अनेकवेळा महिलांचे सौभाग्याचे लेणे म्हणजे मंगळसूत्र चोरांनी यांनी लुटून नेले आहे. तसेच मध्यतंरी काही अनधिकृत बोगस कॅफेही सुरु झाले होते. यामुळे सदर परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी असावी अशी नागरिकांची मागणी होती. प्रतिभाताई चौधरी यांनी या भागात एक अद्ययावत पोलीस चौकी मंजूर करून आणली आहे. विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृही बांधले जाणार आहे. ही सर्व कामे मंजूर करण्यासाठी मला फार पाठपुरावा करावा लागला. मुंबईत मंत्रालय तसेच धुळ्यात विविध शासकीय कार्यालय येथे प्रयत्न करावे लागले. त्यानंतर सदर निधी मिळवून आज प्रत्यक्षात विकासकामांचा शुभारंभ पालकमंत्री गिरीष महाजन आणि महामंत्री विजय चौधरी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी महामंत्री विजय चौधरी यांनी सांगितले की, माझ्या भगिनी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांच्या विशेष पाठ्पुराव्यामुळे मंजूर झालेल्या निधीतून आज चौक सुशोभिकरण, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, ज्येष्ठ नागरिक सभागृह, आनंदनगर येथे पोलीस चौकी होणार आहे. फार महत्वाच्या कामांचा शुभारंभ आज होत आहे. यामुळे सदर परिसराच्या आणि धुळे शहराच्या सौंदर्यात निश्चितच भर पडणार आहे. माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांना महापौरपदाचा कमी कालावधी मिळाला. कमी कालावधीत त्यांनी प्रामाणिक, पारदर्शक आणि भरीव कामे करून आपाल वेगळा ठसा उमटवला आहे.
यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रतिभाताई महापौर असताना फक्त आणि फक्त धुळे शहराच्या विकासकामांचा विषय घेऊन माझ्याकडे सतत पाठपुरावा करीत असत. १० कोटींच्या निधीसाठी त्यांचा विशेष पाठपुरावा होता. आज धुळे शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, इंदिरा उद्यान, आनंदनगर परिसर येथे सुशोभिकरण केले जाणार आहे. यात मला आराखडा आणि चित्र दाखवण्यात आले, ज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांप्रमाणे भिंत फार सुरेख बनवण्यात येणार आहे. तसेच या भागात अनेक वर्षांपासून असलेली पोलीस चौकीची मागणीही माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांच्यामुळे पूर्णत्वास येणार आहे. तसेच भविष्यात पोलीस चौकीस कायम स्वरूपी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली जाईल. विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची फार गरज असते. तेथे त्यांचा चांगला अभ्यास होऊन भविष्यात ते मोठे अधिकारी होऊन देशाचे उज्ज्वल भविष्य घडणार आहेत. तसेच सदर भागात ज्येष्ठ नागरिकांची संख्याही जादा असल्याने त्यांच्यासाठी एक सभागृही बनवले जाणार आहे. प्रतिभाताई ह्या यापुढेही अशीच कामे करण्यासाठी सदिच्छा व शुभेच्छा देतो. म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, इंदिरा उद्यान चौक सुशोभीकरण करणे, आनंदनगर येथील इंदिरा उद्यान परिसर विकसित करून पोलीस चौकी बांधणे, सर्व्हे नं १४/१ येथे अभ्यासिका व जेष्ठ नागरिकांसाठी सभा मंडप उभारणे या कामांचा आज शुभारंभ झाल्याचे जाहीर करत आहे.
यावेळी नागरिकांनी विविध विकासकामे मंजूर केल्याबद्दल माजी महापौर प्रतिभाताई चौधरी यांचा जाहीर सत्कार करून आभार मानले.
यावेळी माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, मनपा प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर जयश्रीताई अहिरराव, प्रदेश सदस्या डॉ. माधुरी बाफना, ओबीसी संयोजीका मायादेवी परदेशी, माजी स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, सेवानिवृत्त अभियंता कैलास शिंदे, नगरसचिव मनोज वाघ, मराठा सेवा संघाचे साहेबराव देसाई, अभियंता प्रदीप चव्हाण, वर्षा पाटील, आझाद नगर मंडळ अध्यक्ष बबनराव चौधरी, देवपूर मंडल अध्यक्ष अरुण पवार, रंजना पाटील, गिरीष मराठे, कृपेश नांद्रे, प्रा. उदय तोरवणे, प्रा. बिपीन सोनवणे, सुमित बोरसे, हरिष चौधरी, सुधीर बोरसे, भारत वाघ, सचिन दहिते, भटू चौधरी, प्रवीण बोरसे, शेखर कुलकर्णी, महेंद्र बेहरे, पवन खानकरी, योगेश मोराणकर, शरद चौधरी, संजय ठाकूर, भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सागर चौधरी, प्रा. मनोज पाटील, वैभव सयाजी, योगेश चौधरी, विकास चौधरी, केतन पाटील, किशन चौधरी यांच्यासह प्रभागातील विविध नागरिक बंधू-भगिनी मान्यवर उपस्थितीत होते.