महंत रामगिरी महाराजवर सक्त कारवाई करा! अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन, एमआयएमचा इशारा
धुळे : महंत रामगिरी महाराजांनी सिन्नर येथे प्रवचन देताना धार्मिक द्वेष पसरविणारी वक्तव्य केली. तसेच प्रेषित पैगंबर यांच्याबद्दल गैरशब्द वापरले. महंत रामगिरी महाराजांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी धुळे जिल्हा एमआयएमच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात येवून निवेदन देण्यात आले.
महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या पंचाळे गावात प्रवचना करताना प्रेषित पैगंबर साहेब यांच्या व इस्लाम धर्माविषयी केलेल्या वक्तव्याने संपूर्ण मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. वास्तविक जगातला कुठलाच धर्म इतर धर्माच्या निंदा-नालस्तीला परवानगी देत नाही. किंबहुना अशा गोष्टींचे समर्थन करीत नाही. कदाचित गेल्या निवडणुकीत जनतेने अशा धर्मांध शक्तींचे तोंड फोडल्यामुळे महाराष्ट्रातील येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून धार्मिक धृवीकरणाचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा संशय आम्हाला आहे. त्यामुळे भविष्यातील अघटीत टाळण्यासाठी अशा धर्मांध शक्तींचा बिमोड करणे काळाची गरज आहे. म्हणून धार्मिक तेढ निर्माण करणा-या रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा एमआईएमच्या वतीने संपूर्ण राज्यात तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी डॉ. दीपश्री नाईक, रफिक पठाण, नजर पठाण, अकिब अली, इद्रीस गणी शेख, हालिम शमसुद्दीन, नजर पठाण, समीर मिर्झा, समीर शेख, फैसल अहमद अन्सारी, अझहर शेख, रफिक काझी, समीर अन्सारी, जुबेर शाह, फहीम अन्सारी, कादिर अन्सारी, मोईन शेख आदी उपस्थित होते.