वक्फ बोर्डाच्या जागेवरून आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली
धुळे : शहरातील वक्फ बोर्डाच्या मालकीची जागा आमदार डॉ. फारुख शाह यांनी आपल्या आईच्या नावे करून बळकावल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. तर आपण कोणतीही जागा बळकावली नसून, सदरचा भूखंड पूर्वीपासूनच वक्फ बोर्डाच्या मालकीचा असल्याचे स्पष्टीकरण धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांनी दिले.
माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळे शहरात कल्याण भवन येथे लोकसंग्राम पक्षाच्या कार्यालयात सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आमदार फारुक शाह यांनी वक्फ बोर्डाची जागा बळकावल्याचा आरोप केला. 1964 सालातील पालिकेच्या मालकीची जागा 1996 साली स्थापन झालेल्या वक्फ बोर्डाची कशी होऊ शकते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महायुतीच्या नेत्यांच्या सक्रिय सहभागामुळेच नटराज टॉकीज समोरील व शेजारील अंदाजे किमान 200 कोटी रुपयांची अंदाजे 32 एकर जागा वक्फ बोर्डाच्या नावावर करून आमदार फारुक शहा यांच्यासह एका मंत्राच्या सहभागाने शहराच्या मध्यवर्ती भागातील भूखंड हडपण्याचे कारस्थान झाले आहे. गरिबांच्या पुनर्वसनासाठी तसेच पोलीस चौकी, टांगा स्टॅण्ड इत्यादी सार्वजनिक लाभासाठी महापालिकेच्या मालकीची जागा आमदारांच्या मातोश्री साबीराबी अन्वर शाह यांच्या नावाने करण्याचे हे कुटील कारस्थान आहे. गरीब मुस्लिम बांधवांच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या वक्फ बोर्डाची जागा हडपणाऱ्या भूमाफियांविरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे अनिल गोटे यांनी सांगितले.
अनिल गोटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, फारुख शाह हे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तत्कालीन आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डावर त्यांची नियुक्ती केली. फारुख शाह हे याच क्षणाची वाट पाहत होते. फारुख शाह यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती होताच त्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी शोधायला सुरुवात केली. आपणास मिळालेल्या अधिकारांचा जास्तीत-जास्त लाभ स्वतःसाठी व कुटुंबीयांसाठी घेऊन, केवळ आणि केवळ मुस्लिम बांधवांसाठी स्थापन करण्यात आलेल्या वक्फ बोर्डाच्या संपत्तीची बेमालूनपणे कशा पद्धतीने लूट करता येईल याचे कारस्थान केले. त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचा प्रारंभ मुस्लिम समाजासाठी पवित्र अशा मशिदीच्या जमिनीपासूनच केला. मुस्लिम समाजाचे दुर्भाग्य की 75 वर्षानंतर मुस्लिम उमेदवारास भाजपच्या छुप्या मदतीने आमदार होण्याची संधी मिळाली. या काळात शहरी गरिबांसाठी 1964 सालापासून आरक्षित असलेल्या जागेवर गरीब मुस्लिम बांधव, माता-भगिनींना निवारा देणे अपेक्षित होते. पण यांनी तर जमीनीमागून जमिनी हडप करून स्वतःच्या पुढील 12 पिढ्यांचे कल्याण करून घेतले.
ती जागा वक्फ बोर्डाचीच : दरम्यान आमदार डॉ. फारुख शाह यांनी अनिल गोटे यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. अनिल गोटे सांगत असलेला भूखंड वक्फ बोर्डाच्या मालकीचा आहे. तो कोणीही बळकवू शकत नाही, असे आमदारांनी स्पष्ट केले.
आमदार फारुख शाह म्हणाले की, आपण मला चांगल्या प्रकारे ओळखतात. मी कुठे राहतो. माझा जन्म कुठे झालेला आहे. त्यामुळे ती जागा वक्फ बोर्डाची आहे. वक्फ बोर्डाचे खीदमतदार माझे आजोबा होते. आणि तेव्हापासून आता आमची चौथी पिढी सुरू आहे. त्यामुळे आम्ही कोणता भूखंड बळकावला? किंवा कुठे गैरव्यवहार केला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जागा वक्फ बोर्डाचीच आहे. 1964 पासूनचे उतारे आमच्याकडे आहेत. 2010 साली जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकारी यांच्याकडे त्याबाबत सुनावणी झालेली आहे. वक्फ बोर्डाच्या जागेचा मालकी हक्क कधीही संपू शकत नाही. कोणीही ताबा करायचा प्रयत्न केला तरी ती जागा वक्फ बोर्डाचीच राहील. सदरची जागा वर्ग दोनची असल्याने वक्फ बोर्डाचीच राहील, असा निर्णय देऊन महसूल विभागाने महापालिकेचे नाव उताऱ्यावरून वगळण्याचा निर्णय दिला आहे. या विरोधात महानगरपालिकेने आठ महिन्यांपूर्वी अपील दाखल केले होते. त्यामुळे आताच्या प्रांताधिकार्यांनी देखील त्या अपीलावर सुनावणी घेऊन आधीचा निर्णय कायम ठेवला आहे. आणि महापालिकेचे अपील फेटाळून लावले आहे. उताऱ्यावरून महानगरपालिकेचे नाव कमी करून वक्फ बोर्डाचे नाव लावले आहे, असे आमदार डॉ. फारुख शाह यांनी स्पष्ट केले.
अनिल गोटे आणि अनुप अग्रवाल यांचा कुटील डाव : आमदार शाह म्हणाले की, अनिल गोटे आणि अनुप अग्रवाल यांचा कुटील डाव आहे. माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजपच्या डॉ. माधुरी बोरसे, माजी महापौर प्रदीप कर्पे यांनी वक्फ बोर्डाच्या जागा बळकावून दवाखाने आणि बंगले उभारले आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी हा सर्व आटापिटा अनिल गोटे आणि अनुप अग्रवाल करीत आहेत.