बदलापूर प्रकरणी धुळ्यात मनसेची निदर्शने
धुळे : बदलापूर घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून संशयित आरोपीला त्वरीत फाशीची शिक्षा द्यावी, या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी सचिव प्राची कुलकर्णी यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन केली.
निवेदनात म्हटले आहे की, बदलापूर येथे एका शाळेत दोन अल्पवयीन बालिकांवर अमानुष अत्याचार झाला. ज्या नराधमाने अत्याचार केला तो त्याच शाळेतील कर्मचारी आहे. त्याच्या विरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा होईल, असे पुरावे द्यावेत आणि फाशी द्यावी, या संपूर्ण प्रकरणाची एस.आय.टी चौकशी करून या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.
या आधी दोन वर्षापासन पूजा वालावलकर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात प्रलंबित आहे. तसे होऊ न देता बदलापूर घटनेचा अत्यंत जलद गतीने न्यायनिवाडा झाला पाहिजे. तरच दोन्ही बालिकांना व त्यांच्या परिवाराला खरा न्याय मिळेल, अशी भावना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदनातून व्यक्त केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या घटनेचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया प्राची कुलकर्णी यांनी दिली.
यावेळी संध्या पाटील, उज्वला कोतवाल, सारिका गुरुबा, प्रतिभा पाटील, अनिल शिरसाठ, राजू दुसाने, संतोष मिस्तरी, दीपक बच्छाव, जयेश भदाने, राहुल पाटील, शामक दादाभाई आदी उपस्थित होते.
संपूर्ण घटनाक्रम असा : ही घटना 13 ऑगस्ट रोजीची असून दोन मुलींवर वेगवेगळ्या दिवशी अत्याचार झाल्याची माहिती आहे.
16 ऑगस्टला पालकांनी बदलापूर पूर्वेतील पोलीस स्टेशनमध्ये शाळेतील अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंदवला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात शाळेतील सफाई कर्मचाऱ्याला अटक केली.
पालकांनी पोलिसांकडे तक्रार करताना सांगितलं, ‘पीडित मुलगी साडे तीन वर्षांची असून आपल्या आजी-आजोबांच्या घरी बदलापूर येथे राहते. आजी-आजोबांना संशय आल्याने त्यांनी आईला अचानक फोन करून कामाच्या ठिकाणाहून घरी बोलावून घेतलं.’
आईने मुलीला विचारलं असता तिने आपल्या प्रायव्हेट पार्टला वेदना होत असल्याचं सांगितलं, तसंच शाळेतील ‘दादा’ नावाचा इसम कसे वर्तन करतो याची माहिती दिली.
एका मुलीच्या माहितीवरून दुसऱ्या आणखी एका मुलीसोबत अशीच काहीशी घटना घडल्याचीही माहिती पालकांना कळाली आणि 16 ऑगस्टला पालकांनी पोलीस स्टेशन गाठलं.
पालकांकडून मुलीची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली असून त्यात लैंगिक शोषण झाल्याचं समोर आल्याचीही माहितीही पोलिसांना पालकांनी दिली.
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपीविरोधात पॉक्सो-बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता कलम 65(2), 74, 75,76 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या कारवाईनंतर शाळा प्रशासनावरही पालकांनी गंभीर आरोप केले आहेत. यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका आणि एका महिला कर्मचाऱ्याचं निलंबन केलं आहे.
16 ऑगस्ट रोजी पालक पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यासाठी गेले असताना पालकांना दहा ते अकरा तास पोलीस स्टेशनला बसवून ठेवण्यात आलं तसंच गुन्हा नोंदवण्यातही दिरंगाई केल्याचा स्थानिक महिलांचा आरोप आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी (विशेष तपास पथक) गठीत करण्याचे निर्देश दिले.
तसंच कर्तव्यात कसूर करणाऱ्या तीन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. यात बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
तसंच या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेत. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, “पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत आवश्यक ती कारवाई केली जात असून, फास्ट ट्रॅक कोर्टासाठी प्रस्ताव मागविण्यात आला आहे. संवेदनशीलतेने पोलीस परिस्थिती हाताळत आहेत. ही घटना उघडकीस आल्यावर तातडीने कारवाई करण्यात आली. तथापि कुठे काही विलंब असेल तर एसआयटी त्याची चौकशी करेल आणि त्यात दोषी आढळणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.”