SC ST Reservation निर्णयाच्या विरुद्ध बहुजन समाज पार्टीची निदर्शने
धुळे : अनुसूचित जाती-जमातींचे वर्गीकरण करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात देशभरातील विविध पक्ष-सघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. या बंदमध्ये बहुजन समाज पार्टीने सक्रीय सहभाग घेतला. धुळ्यातही बसपाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
अनुसूचित जाती-जमातींचे वर्गीकरण करू नये आणि क्रिमिलेयर लावू नये याबाबत संसदेत घटनादुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी धुळ्यात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. तसेच बहुजन समाज पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
मागण्या अशा : न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियन पद्धत बंद करून न्यायाधीशांची नियुक्ती ऑल इंडिया ज्युडिशिअरी सर्विसचे गठन करून यात आरक्षण लागू करावे, एससी, एसटी, ओबीसी भटक्यांच्या आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्युल नऊमध्ये त्याचा अंतर्भाव करावा, ज्याची जेवढी संख्या अधिक तेवढी त्यांची भागीदारी या तत्त्वानुसार जातीनिहाय जनगणना करावी, सर्वांना समान न्याय या तत्त्वानुसार ओपन कॅटेगिरीचेही वर्गीकरण करून त्यांनाही क्रिमिलियर लावावे, खाजगी संस्थांमध्ये आरक्षण लागू करावे आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.
यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष आनंद सैंदाणे, जिल्हा प्रभारी मिलिंद बैसाणे, जिल्हा उपाध्यक्ष किरण मंगळे, जिल्हा महासचिव प्रदीप शिरसाठ, विजय भामरे, विजय मोरे, ॲड. मधुकर भिसे, भाऊसाहेब पवार, अंकुश अहिरे, ज्ञानेश्वर पवार, संग्राम बागुल, नितीन बिराडे आदी उपस्थित होते.