मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे : सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे
धुळे : राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावे असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतंर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील एकूण 73 व महाराष्ट्र राज्यातील 66 तीर्थक्षेत्र स्थळांपैकी एका स्थळाला भेट देता येईल्. या योजनेचा लाभ एकाच वेळी घेता येईल. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती 30 हजार इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ. सर्व बाबींचा समावेश असेल. हा खर्च राज्य शासनामार्फत करण्यात येणार आहे.
पात्रतेचे निकष : लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, वय वर्ष 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिक, लाभार्थी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 पेक्षा जास्त नसावे.
आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, मतदानकार्ड, रेशनकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. (लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड/ मतदार ओळखपत्र/शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र /जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापर्यंत असणे अनिवार्य) किंवा पिवळे / केशरी रेशनकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयं घोषणापत्र, जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक तसेच सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आवश्यक राहील.
यो योजनेचा लाभासाठी जिल्ह्यातील 60 वर्ष व ज्यावरील ज्येष्ठ नागरिकांनी आवश्यक त्या कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे भरावेत. अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ए-विंग, सिंचन भवनाच्या मागे, साक्री रोड,धुळे येथे संपर्क साधावा, असे आवाहन धुळे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.