संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 कार्यान्वित
धुळे : भारत सरकार, महिला व बालविकास विभाग, नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा 1098 संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतिश चव्हाण यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
आपल्या परिसरात जर बाल कामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरीत आवश्यक मदत कोठून व कशी मिळवून देता येईल, याकरिता कोठे संपर्क करावा याबाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम असतो. यासाठी संकटग्रस्त बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 ही सेवा प्रत्येक जिल्ह्यात 1 सप्टेंबर, 2023 पासून संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. या सेवेतंर्गत संकटग्रस्त बालकांना 27 x 7 हेल्पलाईन सेवा उपलब्ध असून या सेवेचा लाभ बालक स्वत: घेवू शकतो किंवा इतर कोणीही यासेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त बालकांनी तसेच संकटग्रस्त, मदतीची आवश्यकता असलेल्यांनी चाईल्ड हेल्पलाईन 1098 टोल फ्री या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री. चव्हाण यांनी केले आहे.