निमडाळे शिवारात तलावात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू
धुळे : तालुक्यातील निमडाळे शिवारात तलावात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली. हितेश विजय सूर्यवंशी आणि मयुर वसंत खोंडे अशी मृत्यूमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. दोघे इयत्ता आठवीचे विद्यार्थी होते.
निमडाळे येथील जयहिंद हायस्कूलने वन भोजनाचा कार्यक्रम 23 ऑगस्ट रोजी आयोजित केला होता. गावापासून तीन किलोमीटर अंतरावर हा कार्यक्रम होता. या सहलीदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. गौण खनिजाच्या उत्खननामुळे तयार झालेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून या मुलांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाला पाठविला आहे.
दरम्यान, दोन्ही मुले तलावात कशी बुडाली, घटनेच्या वेळी शिक्षक नेमके कुठे होते, शिक्षण विभागाकडून सहलीची परवानगी घेतली होती का, याबाबत चौकशी सुरू असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.