धुळे जिल्ह्यासह राज्यात मंगळवारपर्यंत मुसळधार पाऊस
धुळे : शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार आणि संततधार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी धुळे जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला होता. तर शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हा अलर्ट पुढच्या तीन दिवसांसाठी असून, मंगळवारपर्यंत मान्सुनचे जोरदार वारे वाहणार आणि मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
नदी-नाल्यांना पूर : धुळे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. नदी-नाल्यांना पूर आला असून, शेतशिवारांमध्ये पाणी शिरले आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना सततच्या पावसामुळे पंचनाम्याची कामे रखडली आहेत.
जिल्ह्यातील प्रकल्प तुडूंब : जोरदार पावसामुळे अक्कलपाडासह लाटीपाडा, मालनगाव, जामखेडी, गोंदूर, कनोली प्रकल्प आणि इतर लहानमोठे तलाव ऒव्हरफ्लो झाले आहेत. हतनूर आणि अक्कलपाडा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने तापी आणि पांझरा नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धुळे शहरात साचले पाणी : सततच्या पावसामुळे धुळे शहरात विविध शासकीय कार्यालये आणि वसाहतींमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे चाकरमान्यांसह रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे.
तासी 50 किलोमीटर वेगाने पावसाच्या सरी : जळगाव, धुळे, पुणे, सातारा, अहमदनगर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळ व विजांच्या कडकडाटासह ताशी 40-50 किमी वेगाने पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यभर तीन दिवस मुसळधार : राज्यात शनिवार ते मंगळवार या चार दिवसांत मान्सून जोरदार सक्रिय होत असून, राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. धुळे, पुणे, मुंबई, पालघरसह १२ जिल्ह्यांना अतिमुसळधारेचा ऑरेंज अलर्ट, तर कोल्हापूरसह २८ जिल्ह्यांना मुसळधारेचा यलो अलर्ट दिला आहे. बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याने मान्सूनचे वारे प्रचंड वेगाने सक्रिय झाले आहेत. त्यामुळे शनिवार २४ ते मंगळवार २७ ऑगस्ट या कालावधीत राज्यात मान्सून जोरदार बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. धुळे, मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पांझरा नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी : भारतीय हवामान खात्याने धुळे जिल्ह्यास शुक्रवारी रेड अलर्ट तर शनिवारी यलो अर्लट जाहीर केला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. विशेषतः साक्री तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे पांझरा, जामखेडी, मालनगाव प्रकल्पातून पाण्याचा येवा सतत वाढतच आहेत. तसेच निम्न पांझरा प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने पांझरा नदीपात्रासह इतर नदीनाल्यांना पूर आलेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज पांझरा नदीपात्रास भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार अरुण शेवाळे तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अक्कलपाडा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग : पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने तसेच वरील बाजूस असणाऱ्या पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा येवा वाढत असल्याने अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असून पुढील काही तासांत विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका तसेच पोलीस प्रशासनास नदीकाठच्या ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त तसेच नदी नाल्याच्या ठिकाणी आवश्यक बँरेकेट्स लावण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. त्याचप्रमाणे नदी नाल्याच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.