पावसाचा जोर वाढला, धुळे जिल्ह्यात रेड अलर्ट
धुळे : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मे हिटसारखा उन्हाचा तडाखा आणि जून महिन्यात असतो तसा उकाडा वाढला होता. परंतु गेल्या आठवड्यापासून पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. मागच्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. धुळे शहरात शुक्रवारी भरदुपारी रात्रीसारखा अंधार झाला होता; इतके ढग दाटून आले होते. पुढचे दोन दिवस धुळे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
धुळ्यात गुरुवारी रात्रभर जोरदार पाऊस झाला. त्यानंतर शुक्रवारी दुपारपासून सुरू झालेल्या आपावसाने नदी, नाले, जंगल आणि शेतशिवारांमध्येच नव्हे तर शहरात देखील पुराचे दर्शन घडविले. गेल्या दोन दिवसांपासून जनजीवन विस्कळित झाले आहे.
दरम्यान, हवामान खात्याने धुळे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केल्याची माहिती प्रशासनाने शुक्रवारी दुपारी दिली. पुढचे दोन दिवस धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. पूर्व-मध्य-अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. कर्नाटक-गोवा किनारपट्टीवर आणि दुसरा गंगेतील पश्चिम बंगाल किनारपट्टीवर तयार झाला आहे. यामुळे राज्यात मान्सून तीव्र होण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे.