आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धडा शिकवा : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
खेड : वेळ आली तर देईन मी जान; पण कुणालाच बदलू देणार नाही मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान, अशी काव्यमय सुरुवात करून संविधान कोणीही बदलू शकत नाही. मात्र संविधान बदलण्याची खोटी अफवा पसरवून तरुणांमध्ये गैरसमज निर्माण करणाऱ्या महविकास आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
खेड येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे 3 कोटी 50 लाख निधी खर्च करून उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन आज रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत रामदास आठवले बोलत होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गाव आंबडवे हे मंडणगड तालुक्यात आहे. त्या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्यदिव्य स्मारक उभारणार असल्याचा संकल्प रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केला.
तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्री झाल्याबद्दल ना. रामदास आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रामदास कदम, दापोलीचे आमदार योगेश कदम आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते, अनेक मान्यवर नेते उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल खरी प्रामाणिक प्रेम बाळगणारे नेते आहेत. त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देशात अनेक स्मारके उभारली आहेत. संविधानाला माथा टेकून काम करणारे मोदी आहेत. तरीही मोदींबद्दल अपप्रचार करणाऱ्या माहविकास आघाडीला धडा शिकवा. रिपब्लिकन पक्ष मजबुतीने महायुतीसोबत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचे लवकर जागा वाटप करावे, असे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले.
शिवसेनाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवशक्ती भीमशक्तीचे आपण पुरस्कर्ते असून सर्वप्रथम शिवशक्ती भीमशक्तीची सभा कांदिवली आपण आयोजित केली होती.खेड मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाची आम्हाला बहुमोल साथ लाभत असून या जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाला आम्ही सत्तेचा वाटा मिळवून देऊ, असे आश्वासन रामदास कदम यांनी दिले. आमदार योगेश कदम यांनी खेड, मंडणगड, दापोलीमधील दलित वस्ती आणि सर्व विकासकामे आपण करीत असून प्रत्येक बौद्ध आणि दलित बांधवांना न्याय देण्यासाठी आपण काम करीत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, नरेंद्र गायकवाड, विजय मोरे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.