मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची महत्वाची बातमी
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे तीन महिन्यांचे 4500 रुपये मिळणार होते? मग आमच्या बँक खात्यात 4500 रुपयांऐवजी 3000 रुपये का आले? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार केंद्रांवर तर आधार क्रमांक बॅंक खात्याला लिंक करण्यासाठी बॅंकांमध्ये महिलांची गर्दी उसळली आहे.
कोणाच्या खात्यात किती पैसे येणार? : जुलै महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे दोन महिन्यांचे तीन हजार रूपये पहिल्या टप्प्यात महिलांना मिळाले आहेत. आता दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू झाले असून, पात्र महिलांच्या बॅंक खात्यावर तीन हजार रुपये जमा होणार आहेत. 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात तीन हजार जमा झाले आहेत. 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या पात्र महिलांना अर्ज मंजूर झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात दोन महिन्यांचे तीन हजार रूपये मिळणार आहेत. परंतु बॅंक खाते आणि आधार क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे. ही माहिती प्रशासनाने दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यात चालू झाली. ऑगस्ट महिन्यात या योजनेचा पुण्यातील एका कार्यक्रमात अधिकृतरित्या शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याच्या हिशोबाने पहिल्या टप्प्यात पात्र महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदर 3000 रुपये देण्यात आले. या पहिल्या टप्प्यात 31 जुलैपर्यंत अर्ज भरलेल्या महिलांना पैसे देण्यात आले होते. आता या योजनेचा दुसरा टप्पा चालू झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यात 31 जुलैनंतर अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित 3000 हजार दिले जात आहेत.
4500 रुपये कोणाला मिळणार? : ज्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3000 रुपये मिळालेले नाहीत; त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकूण 4500 रुपये दिले जातील. मात्र त्यासाठी तुमचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे.
अर्ज मंजूर; पण खात्यावर पैसे का जमा होत नाहीत? : अनेक महिलांना अर्ज मंजूर झाल्यावरही पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे पैसे का मिळत नाहीत? असा प्रश्न या महिलांना पडला होता. तर, (Mukhyamantri Mazi Ladki Bahin) या योजनेचा लाभ डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभार्थींच्या बॅंक खात्यात दिला जातो. आधार क्रमांक आणि खाते क्रमांक लिंक नसेल तर खात्यावर पैसे जमा होत नाहीत. त्यासाठी बॅंक खात्याला आधार क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे. आणि बॅंक खात्याला आधार क्रमांक लिंक करण्यासाठी तुमचे आधार कार्ड अपडेट असणे देखील आवश्यक आहे. या तांत्रिक त्रुटींमुळे अनेक महिला लाभापासून वंचित आहेत. परंतु त्यात शासन-प्रशासनाचा दोष नाही. आपले आधार आणि बॅंक खाते अपडेट झाल्यावर लाभ मिळणार असल्याचे महिला आणि बालविकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.