नवनियुक्त नोटरी वकिलांना प्रमाणपत्र व अधिकार द्या!
धुळे : भारत सरकार यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील जेष्ठ वकीलाची गुणवत्ता नुसार नोटरी म्हणून नियुक्ती केली आहे. नियुक्तीचे आदेश मार्च 2024 च्या नोटिफिकेशनप्रमाणे झाले आहेत. आदेशाप्रमाणे पुढील कारवाई अद्याप झालेले नाही. नवनियुक्त नोटरी यांना जोपर्यंत भारत सरकारकडून नोटरीचे प्रमाणपत्र व अधिकार प्राप्त होत नाहीत, तो पावतो नोटरीचे कामकाज करता येणार नाही. हे प्रमाणपत्र त्वरित मिळावे याकरिता वकिलांनी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांची भेट घेऊन मागणी केली.
वकिलांची नोटरी म्हणून नेमणूक होऊन अनेक दिवस झाले आहेत. मात्र अद्यापही नोटरी कामकाज करण्याबाबतचे अधिकार प्राप्त झालेले नाहीत. लोकसभा सदस्य म्हणून गांभीर्याने लक्ष देऊन पाठपुरावा करावा; जेणेकरून नवनियुक्त नोकरी अधिकारी यांना नोटरी कामकाजाचे प्रमाणपत्र व अधिकार प्राप्त होतील. नवनियुक्त नोटरी अधिकारी यांना लवकरात लवकर नोटरी कामकाजाचे प्रमाणपत्र व अधिकार प्राप्त कसे होतील याबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी वकिलांच्या वतीने खासदार डॉ. बच्छाव यांची भेट घेऊन करण्यात आली. खासदार डॉ. बच्छाव यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून त्वरित विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी जेष्ठ विधीज्ज्ञ ॲड. यशवंत जाधव, अनिल मैन, ॲड. अमित दुसाने, ॲड. जितेंद्र निळे, ॲड. अमोल पाटील, ॲड. शिरीष वैद्य उपस्थित होते.