मणियार कॉलनीत रस्ता कॉंक्रिटकरण कामाचे लोकार्पण
धुळे : महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक १२ मणियार कॉलनीत रस्ता कॉंक्रिटकरण करणे कामाचे लोकार्पण आमदार फारुक शाह यांचे बंधु सलिम शाह यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.
मणियार कॉलनी, हजार खोली, दुर्बल घटक सोसायटी, गरीब नवाजनगर, शंभर फुटी रोड प्रभाग क्रमांक १९ व १२ या भागात पाच वर्षांपूर्वी एकही रस्ता नसल्यामुळे या भागातील नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत होता. आमदार फारुक शाह निवडून आल्यानंतर या भागातील व परिसरातील संपूर्ण रस्ते करण्याचे काम व मूलभूत सुविधा देण्याचे काम त्यांनी केले. धुळे शहरात वंचित असलेल्या भागाला न्याय देण्याचे काम तसेच ज्या भागात मूलभूत सोयी सुविधांचा अभाव होता त्या भागाचा पूर्ण अभ्यास करून शहरातील या भागात रस्ते गटारी व पाणीपुरवठ्याच्या सोयीसाठी पाईपलाईनचे काम आमदारांनी आपल्या व शासनाच्या निधीतून केले.
मणियार कॉलनीतील रस्ता लहदारीयोग्य नव्हता. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आमदार फारुक शाह यांच्याकडे या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्याला तात्काळ प्रतिसाद देत आमदारांनी निधी उपलब्ध करून दिला आणि आज या रस्त्याचे लोकार्पण त्यांचे बंधु सलिम शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
आपल्या भावना व्यक्त करताना रहिवाशांनी सांगितले की, आम्हाला आगामी पंचवार्षिकसाठी सुद्धा अशाच आमदारांची गरज आहे; जे लोकांच्या भावना समजून तात्काळ काम मार्गी लावून देतात.
यावेळी सईद बेग, माजी नगरसेवक साबीर सय्यद, साजिद साई, मौलाना शकील, डॉ. शराफत अली, छोटू मच्छीवाले, अनिस शाह, खालिद नोकिया, हाजी सत्तार शाह, इकबाल शाह, मुक्तार शेख, अबुल हलीम अन्सारी, बबलू शेख, हाफिज शेख, माजीद पठाण, इद्रिस शेख, सउद आलम, कौसर शाह, मोहसीन शाह याच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.