दगडाने ठेचून बापाचा खून करणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा दाखल
धुळे : वडिलांनी कामधंदा करण्यास सांगितल्याचा राग आल्याने मुलाने दगडाने ठेचून वडिलांचा खून केल्याची संतापजनक घटना धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील खरगाव गावात पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमाराला घडली.
विजय बापू कुवर (वय 25) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने त्याचे वडिल बापू पांड्या कुवर (47) यांचा खून केला, अशी फिर्याद संशयित आरोपीच्या आईने पोलिसांना दिली. त्यानुसार संशयित विजय कुवर याच्याविरोधात सहा सप्टेंबर रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 103 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे करत आहेत.
मुलांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी काहीतरी रोजगार शोधावा, कामधंदा करावा अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. तसा सल्ला ते सतत आपल्या मुलांना देत असतात. काही मुले आई-वडिलांच्या सांगण्याप्रमाणे रोजगाराला लागतात तर काही जण सतत दुर्लक्ष करतात. पण धुळे जिल्ह्यात अतीशय विपरीत घटना घडली.
पिंपळनेरजवळच्या वार्सा पोस्ट अंतर्गत येणाऱ्या खरगाव पाड्यात शेतातील घरात राहणारे बापू पांड्या कुवर आणि फुलाबाई (45) या दाम्पत्याला विजय नामक मुलगा आहे. पाच सप्टेंबरला फुलाबाई शेतीकामासाठी गेल्या होत्या. त्यावेळी बापू कुवर यांनी कामधंदा करण्याबाबत विचारणा केली. यावरून मुलगा आणि वडील यांच्यात भांडण झाले. विजय कुवर याने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्यांचा खून केला. फुलाबाई सायंकाळी कामावरून घरी परतल्या त्यावेळी संशयित विजय हा घाबरलेल्या अवस्थेत पिशवी घेऊन पसार झाला. फुलाबाई घरात गेल्या त्यावेळी त्यांचे पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्यांनी पाहिले. त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, पोलीस उपनिरीक्षक भूषण शेवाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.