प्रा. घनश्याम थोरात पद्मश्री पुरस्काराचे धुळे जिल्ह्यातून एकमेव नाॅमिनी, जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा
धुळे : येथील प्रसिद्ध विधी अभ्यासक, रंगकर्मी, मानसतज्ज्ञ, प्रा. डॉ. घनश्याम पुंडलिक थोरात हे देशाच्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारासाठी धुळे जिल्ह्यातून एकमेव नाॅमिनी ठरले आहेत. याबद्दल धुळे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी त्यांना शुभेछा दिल्या.
‘पोलीस सायन्स ॲण्ड इमोशनल इंटेलिजन्स’ या विषयावरचा अभ्यासपूर्ण शोधप्रबंध असो की, ‘आंबेडकर राईट्स ॲण्ड इट्स फंडामेंटल कन्सेप्ट’ सारखा शोध प्रबंध असो; प्रा. डॉ. पंडित घनश्याम थोरात यांनी गेल्या वर्षी इंटरनॅशनल सायंटिफिक रिसर्च अमेरिका व वर्ल्ड सायंटिफिक रिसर्च यूकेचा इंटरनॅशनल बेस्ट रिसर्च स्कॉलर ॲवॉर्ड प्राप्त करून आपल्या चतुरस्र व्यासंगाचा दमदार परिचय करून दिला आहे. रंगभूमी विश्वात सर्वात जास्त ‘डिग्री होल्डर’ असलेला कलावंत म्हणून त्यांची जागतिक पातळीवर विश्व रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
खान्देशातील बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, महाकौशल विद्यापिठ जबलपूर, स्वामी विवेकानंद विद्यापिठ सागर (मध्यप्रदेश), नॅशनल नॅक कमिटीने त्यांना ‘बेस्ट रिसर्च स्कोलर’ म्हणून यापूर्वीच गौरविले आहे. प्रा. डॉ. पंडित घनश्याम थोरात यांनी नुकतेच लर्निग कॉलेज लंडनचे पोस्ट ग्रॅज्युएशन इन स्कूल सायन्स ॲण्ड चाईल्ड सायकॉलॉजी विषयात सुवर्णपदक प्राप्त केले आहे. लंडन इथल्या आर्ट ऑफ सोसायटीने त्यांची जागतिक दर्जाच्या ‘ब्रुकलीन इंटरनॅशनल अवार्ड’ साठी निवड केली आहे.
गेली तीन तपे ट्राफिक सेन्स, सामाजिक न्याय, शिक्षण या विषयाशी बांधिलकी जपत आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने आणि प्रतिभासंपन्न गायनाद्वारे लाखो लोकांचे अविरतपणे विवेकवादाचे प्रबोधन करणारे विधी अभ्यासक, प्रसिद्ध रंगकर्मी, मानसतज्ज्ञ, प्रा. डॉ. घनश्याम पुंडलिक थोरात यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पद्मश्री पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि अतीशय किचकट असते. अपेक्षित माहिती आणि पुरावे अपलोड केल्याशिवाय प्रस्ताव दाखल होत नाही. पुरस्कारासाठीचे सर्व निकष आणि पात्रता असलेले प्रस्ताव ऑनलाईन सबमिट होतात. पात्रता नसेल तर अर्ज दाखलच होत नाही. प्रा. डॉ. थोरात यांचा अर्ज यशस्वीपणे दाखल झाला आहे.