स्वयंसेवी संस्थांची दरमहा बैठक घ्या! जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
धुळे : जिल्ह्यातील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांची प्रशासनाने दरमहा बैठक घ्यावी, अशी मागणी धुळे येथील मातोश्री गुंताबाई आखाडे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डी. एम. आखाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली.
डी. एम. आखाडे यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, समाजकल्याण विभागातील विविध योजनांच्या प्रचार व प्रसारामध्ये स्वयंसेवी संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांची दरमहा बैठक घेणे बंधनकारक करावे. आजवर एकही बैठक आयोजित केली नसल्याचे आमच्या संस्थेच्या निदर्शनास आले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार माहितीचे आदान-प्रदान होण्यासाठी दरमहा बैठक आयोजित करणे बंधनकारक आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांची दरमहा बैठक घ्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.