माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
धुळे : काॅंग्रेस पक्षाचे दिग्गज नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. स्व. रोहिदास पाटील यांची अंत्ययात्रा शनिवार, दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील निवसस्थानापासून निघेल आणि एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. अंत्यदर्शन 28 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील सुंदर सावित्री सभागृहात घेता येईल.
रोहिदास पाटील यांचा जन्म 13 जून 1940 रोजी झाला. मॅकेनिकल शाखेत बी.ई. झालेल्या रोहिदास पाटील यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला आणि तत्कालीन कुसुंबा (ता.धुळे) आणि आताच्या धुळे ग्रामीण विधानसभेत एक पंचवार्षिक वगळता निर्विवाद आमदार राहिले. महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे व अन्य खात्याचे मंत्रिपद भुषविलेल्या रोहिदास पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत धुळे जिल्हयातील अक्कलपाडा आणि अन्य प्रकल्प पूर्णतत्वास नेले. तत्पूर्वी रोहिदास पाटील यांचा यूथ चळवळीध्ये सक्रीय सहभाग राहिला. विद्यापीठ व आंतरविद्यापीठ स्तरावर युवा नेतृत्व, जी. एस. टी. आय. इंदूर महाविद्यालय सांस्कृतिक सचिव, सदस्य कॉग्रेस सेवा दल, जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस, उपाध्यक्ष धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी, संस्थापक कै. भाऊसाहेब हिरे स्मृती मंगल कार्यालय आणि सभागृह, संस्थापक जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट धुळे अशी पदे भूषविली.
माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या पश्चात पत्नी लताबाई रोहिदास पाटील, मुलगा विनय पाटील, आमदार कुणाल पाटील, मुलगी सौ.स्मिता चंद्रशेखर पाटील तसेच पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. स्वातंत्र्य सैनिक तथा दिवंगत खासदार चुडामण आनंदा पाटील यांचे ते सुपुत्र होते. तर काॅंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील होत.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी मंत्री रोहिदास पाटील यांना श्रद्धांजलीराजकारण आणि समाजकारणाचा समतोल साधत राज्याच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व म्हणून ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. खानदेशच्या विकासाची तळमळ असणारा सुपुत्र महाराष्ट्राने गमावला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ‘ज्येष्ठ नेते पाटील यांनी दाजीसाहेब म्हणून आदराचे स्थान मिळवले होते. वडीलांकडून राजकारण समाजकारणाचा वारसा मिळालेल्या, उच्चशिक्षित अशा ज्येष्ठ नेते पाटील यांची वाटचाल सरपंच ते राज्याचे मंत्री अशी चढत्या आलेखाची राहीली आहे . विधानसभेचे ते दीर्घकाळ सदस्य राहीले होते. या काळात त्यांनी महत्वाच्या अशा विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. कृषी, सहकार, सिंचन, ग्रामविकास, संसदीय कार्य अशा क्षेत्रांतील अभ्यास, अनुभवाचा उपयोग त्यांनी राज्याच्या विकासासाठी केला. ज्येष्ठे नेते पाटील यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ, मार्गदर्शक असे नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या निधनामुळे झालेला आघात सहन करण्याची ताकद पाटील परिवाराला मिळावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
धुळे जिल्ह्याच्या विकासाला समर्पित नेतृत्व हरपले : उपमुख्यमंत्री अजित पवार“खान्देशचे सुपुत्र, धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील तथा दाजीसाहेबांचे निधन झाल्याचं ऐकून धक्का बसला. राज्याच्या राजकारणात प्रदीर्घ काळ काम करताना दाजीसाहेबांशी सातत्याने संपर्क येत होता. धुळे जिल्ह्याच्या विकासाला वाहून घेतलेलं त्यांचं नेतृत्वं होतं. शैक्षणिक, सामाजिक, सहकार संस्थांच्या उभारणीतून धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले. अक्कलपाडा धरणाच्या निर्मितीतही त्यांची प्रमुख भूमिका होती. त्यांच्या निधनानं धुळे जिल्ह्याच्या, खान्देशचा विकासाला वाहिलेलं समर्पित नेतृत्वं हरपलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियाप्रति सहसंवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करुन माजी मंत्री रोहिदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.