पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना
धुळे : कृषिक्षेत्रात उत्पादन वाढीमध्ये फळ पिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळ पिकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतक-यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळपिकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास येणारा तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतक-यांच्या फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्यादृष्टीने मदत होईल. त्यासाठी राज्यात, जिल्ह्यात प्राधान्याने पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे.
विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकाच्या उत्पादकतेवर विपरित परिणाम होऊन मोठया प्रमाणात उत्पादनामध्ये घट येते. पर्यायाने शेतक-यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करुन शेतक-यांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित पिक विमा योजना राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या योजनेतंर्गत द्राक्ष पिकासाठी 19 हजार रुपयात 3 लाख 80 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळत आहे. तरी धुळे जिल्ह्यातील शेतक-यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कैलास शिरसाठ, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना धुळे जिल्ह्यात आंबिया बहारासाठी आंबा, केळी, द्राक्ष, पपई या फळपिकास विम्यासाठी महसूल मंडळ हा घटक धरुन राबविण्यात येत आहे. आंबिया बहार 2024-25 या वर्षासाठी अधिसुचित फळपिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी खालीलप्रमाणे निर्धारित करण्यात आला असून सदरचे निर्धारित केलेले हवामान धोके लागू झाल्यास विमाधारक शेतक-यांना नुकसान भरपाई देय होईल.
आंबा पिकासाठी अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीठ या धोक्यांसाठी शेतकरी विमा हप्ता 8500 इतका असून यासाठी 1 लाख 70 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. तर यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर, 2024 ही आहे.
केळी पिकासाठी कमी तापमान, वेगाचा वारा, जादा तापमान, गारपीठ या धोक्यांसाठी शेतकरी विमा हप्ता 8500 इतका असून यासाठी 1 लाख 70 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. तर यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर, 2024 ही आहे.
द्राक्ष पिकासाठी अवेळी पाऊस, दैनंदिन कमी तापमान, गारपीठ या धोक्यांसाठी शेतकरी विमा हप्ता 19 हजार इतका असून यासाठी 3 लाख 80 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. तर यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर, 2024 ही आहे.
पपई पिकासाठी कमी तापमान, वेगाचा वारा, जास्त पाऊस व आर्द्रता, गारपीठ या धोक्यांसाठी शेतकरी विमा हप्ता 2 हजार इतका असून यासाठी 40 हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. तर यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर, 2024 असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. शिरसाठ यांनी कळविले आहे.