शिरपूरचे आमदार काशिराम पावरा 1 लाख 45 हजार 944 मतांनी महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी, विरोधक चारही मुंड्या चीत, सर्व विरोधकांचे डिपॉजिट जप्त, शिरपुरात जल्लोष
शिरपूर : शिरपुरचे आमदार काशिराम दादा पावरा 1 लाख 45 हजार 944 मतांनी महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले असून विरोधक चारही मुंड्या चीत झाले आहेत तर सर्व विरोधकांचे डिपॉजिट जप्त झालं आहे. शिरपूर जनक व्हिला, आमदार कार्यालय, मतमोजणी ठिकाणी तसेच सर्वत्र शहरासह तालुकाभर मोठा जल्लोष करण्यात आला.
विधानसभा मतदारसंघासाठी एकूण सहा उमेदवार रिंगणात होते. काशिराम वेचान पावरा (मु.पो. सुळे ता. शिरपूर, भारतीय जनता पार्टी, कमळ यांनी 1 लाख 78 हजार 73 मते मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे मताधिक्य प्राप्त केले. त्यांनी विरोधक डॉ. जितेंद्र ठाकूर यांचा 1 लाख 45 हजार 944 मतांनी पराभव केला. विरोधात संदिप देविदास भिल (बागुल) (मु.टेंभे बु. पो. टेकवाडे, बहुजन समाज पार्टी, हत्ती) यांना 2586 मते, बुधा मला पावरा (मलखान नगर, हिसाळे पो. हिसाळे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, कणीस आणि विळा) 10 हजार 38 मते, गितांजली शशिकांत कोळी (पाण्याची टाकी, नेहरु नगर गल्ली नं. १० देवपूर, धुळे, अपक्ष, बॅट) 1632मते, डॉ. जितेंद्र युवराज ठाकूर (पित्रेश्वर कॉलनी, शिरपूर, अपक्ष, ट्रम्पेट) 32 हजार 129, अॅड. वर्षा रमेश वसावे (मु.पो. उमर्दा, अपक्ष, शिट्टी) यांना 5042 मते मिळाले. यात नोटा ला 2664 मते देण्यात आले. मतमोजणी 24 फेऱ्यांमध्ये पूर्ण झाले असून 1 ते 24 प्रत्येक फेरीमध्ये आमदार काशिराम दादा पावरा यांनी मोठे मताधिक्य घेतले.
शिरपूर विधानसभा मतदार संघासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान सुरळीत व शांततेत पार पडले असून या निवडणुकीची मतमोजणीची शनिवार 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजेपासून मुकेशभाई पटेल टाऊन हॉल, शिरपूर येथे सुरु झाली. या मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल लावण्यात आले होते. पोस्टल मतमोजणीसाठी सहा टेबलची व्यवस्था करण्यात आली होती. या मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर दोन कर्मचारी, एक पर्यवेक्षक व एक सूक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली. शिरपूर विधानसभा मतदार संघात एकूण 336 मतदान केंद्र होते. एका फेरीत 14 मतदान केंद्रांची मतमोजणी झाली. त्यानुसार मतमोजणीच्या एकूण 24 फेऱ्या झाल्या. या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी एकूण 250 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक, कार्यकारी अभियंता पंडागळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेंद्र माळी, पोलीस प्रशासन यांनी अतिशय परिश्रमपूर्वक यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली.
शिरपूर शहर व तालुक्यात 1985 पासून माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांची एकहाती सत्ता अबाधित राहिली आहे. भाई 1990 पासून 2009 पर्यंत शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे सलग चार टर्म आमदार होते. 1985 पासून शिरपूर वरवाडे नगरपरिषद तसेच संपूर्ण शिरपूर तालुक्यातील विविध संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. भाईंनी गेल्या 40 वर्षात केलेल्या विकासकामांमुळे 40 वर्षात त्यांचे वर्चस्व अबाधित राहिले आहे. सलग चार वेळेस जसे भाई आमदार राहिले तसेच सलग तीन वेळेस आमदारकीची टर्म यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर सलग चौथ्यांदा काशिराम दादा पावरा हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
आमदार अमरिशभाई पटेल प्रतिक्रिया : मी व आमदार काशिराम दादा पावरा आम्ही शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न केले आहेत. आम्ही फक्त विकासाची कामे करतो व विकासावरच बोलतो. कोणावरही कधी टीका करत नाही. येत्या पाच वर्षात आम्ही दोघे मोठ्या गतीने तालुक्याचा विकास साधणार. शिरपूर तालुक्यात सर्वसामान्य जनतेची सातत्याने सेवा करु असे यावेळी आमदार अमरिशभाई पटेल म्हणाले.
आमदार काशिराम पावरा प्रतिक्रिया : शिरपूर तालुक्यातील जनतेला सुख सोयी, सुविधा प्राप्त करून देण्यासाठी मनापासून प्रयत्न केले आहेत. जनतेची मनापासून सेवा करणार असून शासकीय लाभापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी आम्ही अजून यंत्रणा राबविणार. महाराष्ट्रातील सर्वात जास्त शासकीय योजनांचा लाभ आम्ही शिरपूर तालुक्यातील जनतेला मिळवून दिला आहे. यापुढे आमच्या तालुक्याची जनता सुखी संपन्न होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार.