बाभळे गावात बोगस मतदानाच्या विरोधात सह्यांची मोहीम
धुळे : जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या बाभळे फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. पुरोगामी विचारवंत प्राचार्य बी. एच. पवार यांनी शिवरायांच्या विचारांवर व्याख्यान झाले. या कार्यक्रमाला बाभळे गावासह पंचक्रोशीतील गावकरी उपस्थित होते. बाभळे गावात झालेल्या बोगस मतदानाच्या विरोधात सह्यांची मोहीम देखील यावेळी राबविण्यात आली. प्रशासनाने त्वरीत योग्य ती कार्यवाही केली नाही तर एक मार्चला धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आत्मदहन करण्याचा इशारा ज्ञानेश्वर पाटील यांनी दिला.
यावेळी उप सरपंच भरत पाटील, सार्वे गावाचे सरपंच शरद पाटील, डोंगरगावचे सरपंच प्रकाश पाटील, पिंपरखेडाचे सरपंच राजेंद्र देवरे, ग्रामपंचायत सदस्य हिरकनबाई भिल, कलमाडीचे सरपंच सोनू मालचे, ग्रामपंचायत सदस्य रामदास भिल, माजी ग्रामपंचायत सदस्य सायबु मोरे, राम मंदिर सेवेकरी रमेश गिरी, माजी सैनिक ईश्वर कोळी, माजी सरपंच चंद्रकांत बिंदासराव, माजी सरपंच भिका पवार, माजी पोलीस पाटील विलास पाटील, वाघाडीचे पोलीस पाटील सुदाम महाजन, बाभळे येथील महिला चमेली पाटील, भुराबाई भिल, सविता पाटिल, धनश्री पाटील, आशाबाई पाटील, समाधान पाटील, साहेबराव मोरे, रतन मालचे, महादू मालचे, राजू मोरे, वाघाडी खुर्द येथील मंगलबाई कोळी, रुखमा मोरे, भागाबाई बागुल, अमृत सोनवणे, अनिल पवार, संभाजी सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बोगस मतदानाचं प्रकरण नेमकं आहे तरी काय? : बाभळे येथील यादी भाग क्रमांक 257 मधील मतदार यादीत बोगस मतदार समाविष्ट करण्याचा गैरप्रकार सुरू आहे. काही मतदार हे कायमचे बाभळे गावाचे रहिवासी नसून त्यांचे बनावट आधार कार्ड तयार करण्यात आले. तसेच मतदार नोंदणीला रहिवासी लागणारा जो काही पुरावा लागतो तो बनावट तयार करून त्यांची नावे समाविष्ट करून घेण्याचं काम या ठिकाणी सर्रासपणे सुरू आहे. तसेच यादी भाग क्रमांक 257 मध्ये 26 ऑक्टोबर 2023 रोजी एकूण मतदार संख्या 902 होती. तीच संख्या 30 ऑगस्ट 2024 रोजी 995 झाली. तसेच आज रोजी बीएलओ यांना एकूण मतदार संख्या विचारली असता त्यांच्याकडून माहिती मिळाली की, एकूण मतदार संख्या एक हजार 425 इतकी दिसून येत आहे.