भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, प्रकांड पंडित, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध विषयात अभ्यासपूर्वक नैपुण्य मिळविले होते. या नैपुण्याचा वापर त्यांनी भारताच्या विकासाच्या रोडमॅपसाठी केला. अशा या महामानवाची १३४ वी जयंती सोमवार १४ एप्रिल २०२५ रोजी सर्वत्र साजरी होत आहे. यानिमित्त हा लेख…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला प्रदान केलेल्या संवैधानिक लोकशाहीमुळे आज भारत सक्षमपणे जगासमोर उभा आहे. गेल्या 77 वर्षात मागासवर्गीय समाजाची जी चौफेर प्रगती झाली त्यात भारतीय संविधानाचा मोठा वाटा आहे. बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधानामुळेच ही प्रगती झाली ते नाकारून चालणार नाही. त्यांनी समाजाला आत्मभान दिले. सामर्थ्याची जाणीव दिली, स्वाभिमान आणि अस्मिता रक्षणाची शिकवण दिली. जगण्याचे बळ दिले आणि संघर्षाची ओळख ही दिली. देशाच्या नव उभारणीचे वैभव राज्यघटनेच्या रूपाने त्यांनी दिले. त्यामुळे त्यांना नवनिर्मिक महापुरुष असे संबोधणे सयुक्तिक होईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सामाजिक शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, नीतीशास्त्राचे अभ्यासक, धर्मशास्त्राचे अभ्यासक, म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. भांडवलशाही, निरनिराळी युद्धे, कायदे, विविध देशांच्या राज्यघटना यांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. सर्व धर्मांची चिकित्सा त्यांनी केली. त्याचा उपयोग त्यांना बौद्ध धम्म स्वीकारताना झाला. धम्म वैज्ञानिक आहे हे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातून त्यांनी सिद्ध केलेले आहे. त्यांच्या चिंतनात लेखनात, ज्ञानाची रसदार अनुभूती येते.
लाहोरच्या जातपात तोडक मंडळाच्या 1936 मध्ये झालेल्या परिषदेत त्यांचे एक भाषण होऊ दिले नाही. नंतर ते भाषण त्यांनी प्रसिद्ध केले. त्यांनी चातुर्वर्ण्य पूर्णत: तिरस्करणीय असल्याचे म्हटले आहे. जुनी वर्ण बिरुदे कायम ठेवलेले नवे चातुर्वर्ण पूर्णपणे तिरस्करणीय आहेत. माझे संपूर्ण व्यक्तिमत्व त्याविरुद्ध बंड करून उठते. आज मी चातुर्वर्णा संबंधी माझे आक्षेप केवळ भावनेच्या आधारावर मांडू इच्छित नाही. त्याला विरोध करण्यासाठी माझ्याकडे अधिक भक्कम कारणे आहेत. त्याचा मी आधार घेतो. या आदर्शाचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर माझे असे मत झाले आहे की, समाज संघटनांची व्यवस्था म्हणून चातुरवर्ण अव्यवहार्य आणि हानिकारक आहे. ते सपशेल फसलेले आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून चातुर्वर्ण व्यवस्था अनेक अडचणी निर्माण करते. त्या तिच्या पाठीराख्यांनी विचारात घेतल्याचे जाणवत नाही. असे स्पष्टपणे बाबासाहेब नोंदवतात. त्यांच्या या प्रतिपादनाचा कोणीही प्रतिवाद केलेला दिसत नाही. यातच त्यांची मांडणी किती निर्दोष आहे हे सिद्ध होते.

भारतीय संविधान तयार करताना त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले असले तरी असंख्य विद्वान संविधान समितीत होते. डॉ. राजेंद्र प्रसाद संविधान समितीचे अध्यक्ष होते आणि बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष होते. काँग्रेसने ठराव करून त्यांना हे पद बहाल केले होते. अनेकांनी अनेक वेळा मसुद्यावर चर्चा केली. शंका उपस्थित केल्या. सर्व बैठकांमध्ये बाबासाहेबांनी सर्वांचे समाधान करण्याचे काम केले. अशा प्रकारे तावून-सुलाखून भारताची राज्यघटना तयार झाली. 26 जानेवारी 1950 पासून ती देशात लागू झाली. देशातील जनतेने जनतेसाठी म्हणजे स्वतःसाठी तयार केलेली ही घटना आम्ही भारताचे नागरिक स्वतः प्रति अर्पण करीत आहोत अशी अनोखी संकल्पना यात आहे. संविधानात सुमारे 113 वेळा दुरुस्त्या झाल्या. परंतु त्यातील मूळ गाभा बदलता येत नाही अशा पद्धतीने तो तयार करण्यात आलेला आहे. त्या गाभ्याला पर्याय नाही. प्रत्येक मुद्द्यावर संविधानात चर्चा करण्यात आलेली आहे. त्यात कुठले बदल करता येतील किंवा कुठले करता येणार नाहीत याबद्दलची मार्गदर्शक तत्वे देखील नमूद करण्यात आलेली आहेत. संविधानाने मागासवर्गीयांना, अल्पसंख्याकांना, अनुसूचित जाती जमातींना, जे अधिकार प्रदान केले ते फार महत्त्वाचे आहेत. संविधान हा विकासाचा ऐवज आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्याची बूज राखणे आणि त्यावर अंमलबजावणी करणे हे सरकारचे आणि प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. ते कोणीही विसरता कामा नये. संविधान पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे आपला धर्म आणि आपली जात भारतीय असावी. आपला धर्मग्रंथ संविधान असावा ही प्रत्येकाची भूमिका असली पाहिजे तरच बाबासाहेबांचे स्मरण करण्याचा अधिकार आपल्याला पोहोचतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित भारतीय राज्यघटनेतील तरतुदीमुळेच आज भारत देश एकात्म असल्याचे जगाला दिसते. भारतात कधीही हुकूमशाही येऊ शकली नाही. बाबासाहेबांनी प्रत्येक भारतीयांच्या विकासासाठी समान संधी आणि मुलभूत अधिकार देवून देशाला प्रगतीपथावर नेण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. राज्यघटनेतील मूलभूत हक्क, कर्तव्ये, त्रिस्तरीय पंचायत राज मधून सर्वसामान्यांचा सत्तेत सहभाग, वंचितांना संधीची उपलब्धता, राज्य आणि केंद्र यामधील सुयोग्य समन्वय ही राज्यघटनेची उपायुक्तता वाढविणारी तत्वे आहेत. डॉ. बाबासाहेबांच्या राज्यघटनेतील कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या कलमांमुळेच देशात शांतता आणि सुरक्षितता आहे. अन्यथा विविध धर्मीय-जातीय-पंथीय मतभिन्नता असलेला आपला देश धार्मिक अतिरेकी झाला असता. आपल्या देशात अराजकता निर्माण झाल्यास देशात किती भयावह स्थिती निर्माण होईल, याचा विचारही मनात भय निर्माण करणारा वाटतो. देशात शांतता, सुरक्षितता आणि अखंडता कायम आहे ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच अबाधित आहे. बहिष्कृत हितकारिणी सभा , चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह घडवून आणून त्यांनी उपेक्षितांच्या मनात स्वाभिमानाची बीजे पेरली. शैक्षणिक संस्था स्थापन करून करोडो बहुजनांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.

भारतीय अर्थव्यवस्थेला मार्गदर्शक ठरणारे अर्थशास्त्री म्हणून उदयाला आलेले बाबासाहेब डॉ.आंबेडकर स्त्रियांच्या हक्कासाठी , बहुजनांच्या हित रक्षणासाठी १९५२ साली आपला कायदेमंत्री पदाचा राजीनामा देणारे, रात्रंदिन अध्ययन करून विद्येची अखंड सेवा करणारे आंबेडकर, राज्यघटनेच्या ४५ व्या कलमान्वये १४ वर्षाखालील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करणारे शिक्षणतज्ञ म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत सारखे उपेक्षितांच्या मनात स्वाभिमान जागविणारे वृत्तपत्र चालविणारे एक झुंजार पत्रकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ख्यातकीर्त पावलेले आहेत. जगातील सर्वात मोठ्या संसदीय शासन प्रणालीचे प्रणेते, जहाल अभ्यासू वक्ता शेकडो वैचारिक पुस्तके लिहणारे जागतिक दर्जाचे लेखक म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जगभर पसरलेले आहे.
भारतीय जलनीतीचे संकल्पक या नात्यानेही त्यांच्याकडे बघावे लागेल. कुटुंब नियोजनचे प्रवर्तक म्हणूनही त्यांचा दृष्टिकोन होता. तो अतिशय महत्वाचा म्हणावा लागेल. लोकसंख्येच्या आजच्या समस्येवर तो उपयुक्त ठरतो. शेतकरी – शेतमजूर – कामगारांचे नेते शैक्षणिक, कृषी, औद्योगिक, साहित्यिक क्षेत्रात मोठी कामगिरी नोंदविणारे यशस्वी नेते म्हणूनही बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण जगात ख्याती आहे. 1954 मध्ये नेपाळ मध्ये काठमांडू इथे झालेल्या “जागतिक बौद्ध धम्म परिषदेत”, बौद्ध भिक्खूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना “बोधिसत्व” ही पदवी प्रदान केली होती. विशेष म्हणजे डॉ.आंबेडकर हयात असतानाच त्यांना बोधिसत्व ही पदवी बहाल करण्यात आली होती.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यानंतरच्या सुधारणांमध्येही त्यांनी योगदान दिले. याशिवाय रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेतही बाबासाहेबांनी मोलाची भूमिका बजावली. बाबासाहेबांचा जीवन प्रवास, त्यांच्या अभ्यासू आणि कृतीशील व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवतो. त्यांनी अर्थशास्त्र, राजकारण, कायदा, तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांचे उत्तम ज्ञान संपादन केले. शिक्षण घेताना त्यांना अनेक सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागले. पण त्यांनी आपले आयुष्य केवळ वाचन-अभ्यास आणि ग्रंथालयात व्यतीत केले नाही. त्यांनी आकर्षक पगाराची उच्च पदे नाकारली. आपल्या शोषित समाजाला ते विसरले नाहीत. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य समता, बंधुता आणि मानवतेसाठी समर्पित केले. उपेक्षित वर्गाच्या उन्नतीसाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. तसेच प्रयत्न महात्मा गांधींनी केले. दोहोंचे अस्पृश्यता निवारणाचे मार्ग वेगळे असले तरी गांधीजींचा त्या विषयीचा कळवळा आणि प्रामाणिकपणा नाकारता येणार नाही. मंदिर प्रवेश, आंतरजातीय विवाह, हरिजन सेवक संघाच्या माध्यमातून उपेक्षितांसाठी शिक्षणाची कवाडे गांधीजींनी खुली केली. त्यामुळे दोघांतील मतभेदांची दरी कमी झाली. आता ती पूर्णपणे रुजविण्याची व दोन्ही महापुरूषांचे मार्ग हातात हात घालून प्रशस्त करण्याची आवश्यकता आहे.

– रमेश दाणे, ज्येष्ठ पत्रकार, धुळे
Mob. 9422288833