धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वेळेस धुळे शहरास भेट दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार ललित चव्हाण यांनी या आठवणींना दिलेला हा उजाळा…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र साजरी होणार आहे. साहजिकच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या जिल्ह्यात किंवा शहरात आले होते. त्यावेळी काय घडले, वातावरण कसे होते, या गोष्टींना उजाळा दिला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर धुळ्यात दोन वेळा आले होते.
डॉ. आंबेडकर त्यांच्या 65 वर्षांच्या आयुष्यात धुळ्यात दोन वेळा आले होते. पहिल्यांदा डॉ. आंबेडकर 29 ते 31 जुलै 1937 ला धुळ्यात आले होते. त्यानंतर 17 जून 1938 ला धुळ्यात आले होते. त्याबाबतच्या ठळक नोंदी आहेत. पहिल्यावेळी बाबासाहेब न्यायालयीन कामकाजासाठी आले होते.
शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील हुलेसिंग मोतीराम जहागीरदार-पाटील आणि मगन मथुरादास वाणी आणि इतर 16 जण यांच्यात बैल पोळयाच्या मुद्द्यावरून वाद झाला होता. यात जहागीरदार यांनी पोळ्याच्या मिरवणुकीत आपले बैल पुढे ठेवण्यासाठीचा अर्ज केला होता. तत्कालिन प्रांताधिकार्यांनी जहागीरदार यांच्या विरोधात निर्णय दिला. त्यावर जहागीरदार यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. या अर्जाच्या सुनावणीसाठी जहागीरदार यांचे वकील प्रेमसिंह तंवर आणि सी. एम. मुळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धुळे येथे न्यायालयीन कामकाजासाठी आमंत्रित केले होते.

बाबासाहेबांच्या युक्तीवादामुळे निकाल जहागिरदार यांना अनुकुल असा लागला. न्यायालयीन कामकाजाच्या निमित्त सर्वप्रथम 29 जुलै 1937 ला बाबासाहेबांचे धुळ्यात पहिल्यांदा आगमन झाले. त्यावेळी समतावादी दलित मंडळ, प्राणयज्ञ दलाच्या कार्यकत्यांनी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडली. त्यात पुनाजीराव लळींगकर, कॅप्टन भिमराव साळुंखे, सखाराम केदार, सुखदेव केदार, देवराम अहिरे, ए.आर.सावंत यांनी बाबासाहेबांच्या स्वागताची तयारी केली होती. बाबासाहेब धुळयात येणार असल्याची बातमी सर्वदूर पोहचल्याने खानदेशातल्या गावागावातून पहाटे चारपासून शेकडो नागरिकांचे जत्थे धुळ्यातील रेल्वेस्थानकाजवळ जमा होऊ लागले होते. सकाळी सव्वासातच्या सुमारास बाबासाहेबांचे रेल्वेस्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. धुळ्यात त्यावेळी बाबासाहेबांचा दोन दिवसांचा मुक्काम होता. लळींग कुरणातील लांडोर बंगल्यात बाबासाहेब मुक्कामी होते.
न्यायालयीन कामकाजाशिवाय बाबासाहेबांनी त्यावेळी धुळ्यात काही उपक्रम राबवित सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला. धुळे शहरातील विजयांनद चित्रमंदिर म्हणजे आजचे स्वस्तिक चित्रमंदिर मध्ये झालेल्या कार्यक्रमातून बाबासाहेबांनी दलित जनतेला मार्गदर्शन केले. लांडोर बंगल्यावर मुक्कामी असताना पुनाजी लळींगकर बाबासाहेबांना भेटायला गेले. लळींगकरांच्या घरी भोजन घेतल्यानंतर बाबासाहेबांनी लांडोर बंगल्याच्या आवारात अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. धुळे शहरातील गरूड वाचनालय, इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळाला बाबासाहेबांनी भेटी दिल्या. त्याठिकाणी त्यांनी अभिप्राय देखील नोंदविले. आण्णासाहेब लळीगकरांची बहिण कृष्णाबाई यांनी स्व-रचित अहिराणी गीतांचे गायन करीत आणि धुळे तालुक्यातील नरव्हाळ येथील शाहीर रतन जाधव यांनी बाबासाहेबांचे मनोरंजन केल्याचे सांगितले जाते. बाबासाहेब 31 जुलैस मुंबईला निघाले तेव्हा त्यांनी आण्णासाहेब लळींगकरांना नंदुरबार येथे जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काम करण्यास सांगितले. लळींगकरांनी तत्कालीन जिल्हाधिकारी कॅप्टन कुर्हे यांच्याकडून नंदुरबार येथे साक्रीनाका परिसरात नदी किनारी जागा मिळवली. त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर छात्रालयाची स्थापना केली. अनेक विद्यार्थी या छत्रालयात राहिले आणि शिकलेत. याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धुळ्यातील नेहरू चौकात हरीजन सेवक संघाच्या राजेंद्र छात्रालयास भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. छात्रालयाच्या पुस्तिकेत बाबासाहेबांंच्या हस्ताक्षरातील अभिप्राय आहे. बाबासाहेब ज्या लांडोर बंगल्यावर थांबले होते, त्या घटनेला उजाळा देण्यासाठी दरवर्षी 31 जुलैस त्यांचे हजारो अनुयायी लांडोर बंगल्यावर एकत्र येतात.

– ललित चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार, धुळे.
Mob. : 7020264977