Dog bitten, treated, child died a month later कुत्रा चावला, उपचार घेतला, एक महिन्यानंतर मुलाचा मृत्यू
Dog Byte news धुळे: मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी एका मुलाचा बळी घेतला आहे. कुत्रा चावल्यानंतर आवश्यक उपचार घेतल्यानंतर देखील मुलाचा मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील हातनूर गावात पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गेल्या महिन्यात हातनूर गावात बारा जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. यातील विराज सयाजी जगताप या १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. त्याच्या चेहऱ्याला कुत्र्याने चावा घेतल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वीराजची प्रकृती सुधारल्याने त्याला घरी पाठवण्यात आले होते. मात्र घटनेच्या एक महिन्यानंतर विराज याला पुन्हा रेबिजचा त्रास होऊ लागल्याने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार दरम्यान विराजचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्या मृत्यू मागील नेमके कारण समजू शकणार आहे. विराज हा घरातील एकुलता एक मुलगा होता. गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट राज्यभर जीवघेणा ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यात कुत्र्यांनी एका मुलीला शेतात ओढून नेले आणि तिच्या शरिराचे लचके तोडून तिला ठार मारले होते. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.