Municipal Corporation started working to avoid water problem in summer
उन्हाळ्यात पाण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून महापालिका लागली कामाला
DMC News Dhule धुळे: उन्हाळ्यासह सणासुदीत पाणी पुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी धुळे महानगरपालिकेने नियोजन सुरू केले आहे. पाणीपुरवठा संदर्भातील अडचणी जाणून घेण्यासाठी महापौर प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी, उपमहापौर नागसेन बोरसे यांच्यासह अधिकार्यांनी बुधवारी बाभळे जलशुध्दीकरण केंद्र व सुकवद पंपीग स्टेशन केंद्रावर जावून पाहणी केली.
पाणीपुरवठा नियमित व वेळेवर व्हावा तसेच पाणी पुरवठा वितरण करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी जाणून घेण्याच्या दृष्टीकोनातून ही पाहणी केली. पाणीपुरवठा वितरणात येत असलेल्या अडचणींमुळे नियोजित वेळेत पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. जलशुध्दीकरण केंद्रावर येणाऱ्या तांत्रिक अडचणी जाणून, शहरातील नागरीकांना उन्हाळा लागण्यापुर्वी नियमित तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा करावा. तसेच मुस्लिम बांधवाचा पवित्र सण रमजान कालावधीत नियमित पाणीपुरवठा करावा असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच सुकवद व बाभळे जलशुध्दीकरण केंद्रावरील व पंपीग स्टेशनवरील वीज पुरवठा खंडित होवू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या.
याप्रसंगी महिला व बालकल्याण उपसभापती विमलताई पाटील, माजी उपमहापौर कल्याणीताई अंपळकर, माजी महिला व बालकल्याण उपसभापती आरती अरूण पवार, नगरसेविका भारतीताई माळी, उपायुक्त विजय सनेर, अभियंता कैलास शिंदे, विद्युत अभियंता एन. के. बागुल, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव चौधरी, केमिस्ट गोसावी आदी उपस्थित होते.