Sky crisis over Baliraja, again hailstorm and stormy rain in Sakri taluka, heavy loss of crops
बळीराजावर आस्मानी संकट, साक्री तालुक्यात पुन्हा गारपीट अन् वादळी पाऊस, पिकांचे मोठे नुकसान
hailstorm in sakri साक्री : बळीराजावर पुन्हा आस्मानी संकट कोसळले असून, साक्री तालुक्यात वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी दुपारनंतर अचानक वादळी पाऊस आणि लिंबूच्या आकारा एवढ्या गारा पडल्याने शेतकऱ्यांसह प्रवाशांची धावपळ उडाली.
होळीच्या दिवशी खोरी टिटाणे परिसरात जोरदार गारपीट झाली होती. पिके उध्वस्त झाली. उरलीसुरली पिके कालच्या गारपिटीने हिरावून घेतली. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याला पुन्हा गारांच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. दुपारपासूनच वादळी वार्यासह मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने साक्री तालुक्यातील शेतकरी व वाहनचालकांची धावपळ उडाली.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार धुळे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून बेमौसमी पाऊस सुरू आहे. ढगाळ वातावरण कायम आहे. साक्री तालुक्यात गहू, हरभरा, टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा, लसूण आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
साक्री परिसरात यंदा निम्म्याहून जास्त शेतक-यांनी कडधान्य पिके घेतली होती. त्या पिकांचे, आंबा मोहोर व काही प्रमाणात आंब्याच्या कैरीही गळून पडल्या. तसेच जनावरांसाठी गोळा केलेला चारा, शेतातच काढून ठेवलेला गहू पूर्णपणे भिजून गेला आहे. परिणामी अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे बळीराजा पुन्हा मोठ्या अडचणीत सापडला आहे.