Dhule Mayor Pratibhatai traveled by bus
धुळ्याच्या महापौर प्रतिभाताईंनी केला बसने प्रवास
Dhule News धुळे: महाराष्ट्र शासनाने महिला सन्मान योजने अंतर्गत बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी शुक्रवारपासून राज्यभर सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर धुळे महापालिकेच्या महापौर प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी pratibha chaudhari यांनी रविवारी दुपारी शिरपूर ते नरडाणा असा बस प्रवास करत या निर्णयाचे स्वागत केले. फक्त बोलणारे नाही तर जे बोलले ते करून दाखवणारे महाराष्ट्राचे सरकार आहे, असे त्या म्हणाल्या.
महाराष्ट्र राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणारं आहे.
राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच ६५ ते ७५ वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती.
त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. सदर सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला प्राप्त होत आहे, अशी माहिती एसटी महामंडळ जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली.
राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्च रोजी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला होता. या अर्थसंकल्पात त्यांनी महिलांना एसटी प्रवासात ५० टक्क्यांची सूट देण्याची घोषणा केली होती. त्याच बरोबर महिलांना सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण लागू करणार असल्याचे ते म्हणाले.
अर्थसंकल्पात फडणवीस यांनी एसटी प्रवासातील सवलीतसोबतच पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर ५ हजार रुपये आणि इतत्ता चौथीनंतर ४ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ६ हजार तर ११वीत ८ हजार रुपये अनुदान म्हणून दिले जातील अशी घोषणा केली. तसेच मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये दिले जातील असे फडणवीस म्हणाले.
Video
https://youtube.com/shorts/KrQzIOYQvUQ?feature=share