MLA Sanjay Gaikwad was protested by the employees
आमदार संजय गायकवाड यांचा कर्मचाऱ्यांनी केला निषेध
Dhule News धुळे : आमदार संजय गायकवाड यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करीत कर्मचाऱ्यांनी धुळे येथे रविवारी आमदार गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून, दहन करून संताप व्यक्त केला.
राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. संजय पाटील यांनी सांगितले की, बेमुदत संपाच्या सहाव्या दिवशी राज्यातील १८ लाख कर्मचारी व शिक्षकांच्या बेमुदत संपामुळे सरकार हादरल्याने, कर्मचाऱ्यांच्या आंदोलना विरोधात जनमत व्हावे या उद्देशाने आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचारी व नोकरदारांविषयी बेताल वक्तव्य केले. कर्मचारी भ्रष्टाचारी असल्याचा घाणेरडा आरोप केला. त्याचे आम्ही खंडण करतो. जे एक दोन टक्के कर्मचारी भ्रष्टाचारी असतील त्यांचे आम्ही कधीच समर्थन करीत नाहीत. त्यांना आम्ही कधीच पाठीशी घालणार नाही. अशा भ्रष्टाचारी प्रवृत्तींच्या अनुषंगाने कायदे जेवढे कडक करता येतील तेवढे कडक करा. परंतु त्या सोबत ९९ टक्के कर्मचाऱ्यांना बदनाम केलेले कधीही सहन केले जाणार नाही. सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने कल्याण भवन धुळे येथे आमदार गायकवाडांच्या बेताल वक्तव्याचा धिक्कार, निषेध व्यक्त करीत प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. प्रतिमेचे दहन करीत संताप व्यक्त करण्यात आला.
राज्य समन्वय समितीने दिलेल्या आंदोलन कार्यक्रमनुसार २० मार्च सोमवार रोजी आपापल्या सरकारी कार्यालये व पंचायत समिती समोर सकाळी दहा वाजता थाळीनाद करून सकाळी अकरा वाजता कल्याण भवन धुळे येथे सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने थाळीनाद करण्यात येईल. जेलरोड येथे जि. प. कर्मचारी सर्व संवर्ग समन्वय समिती समवेत एकत्रित जेलरोड येथे थाळीनाद करण्यात येणार आहे. प्रत्येक कर्मचारी व शिक्षकांनी सोबत थाळी व चमचा आणून थाळीनादद्वारे आपला संताप व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.