The villagers took out a police procession
शेतकऱ्यांचे कापूस विक्रीचे पैसे लुटणाऱ्यांना पकडले, ग्रामस्थांनी काढली पोलिसांची मिरवणूक
Nandurbar News नंदुरबार : येथील दोन शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या धुळे येथील पाच आरोपींना पकडले म्हणून भालेर ग्रामस्थांनी नंदुरबार पोलिसांची मिरवणूक काढली.
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील शेतकऱ्यांची बंदुकीचा धाक दाखवत १३ लाख ९४ हजार रुपयांची लूट केल्याचा गुन्हा अवघ्या ३० तासांत नंदुरबार पोलिस दलाने उघडकीस आणला. गुन्ह्याचा तपास तीव्र गतीने करून शेतकऱ्यांना न्याय दिल्याचा आनंद ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. ग्रामस्थांनी पोलिसांची मिरवणूक काढल्याचा सुखद प्रसंग नंदुरबार पोलीस अधिकाऱ्यांना अनुभवण्यास मिळाला.
भालेर येथील सुनील गंगाराम पाटील आणि हसंराज दगाजी पाटील हे दोन्ही शेतकरी कापूस विक्री करून भालेर येथे घराकडे परत येत असताना त्यांची लूट करण्यात आल्याची घटना भालेर रस्त्यावर होळ फाट्यानजीक घडली होती. चोरट्यांनी १३ लाख ९४ हजार रुपये लुटून नेल्यानंतर गावासह शहरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शेजारील धुळे जिल्ह्यातील पाच आरोपींसह मुद्देमाल हस्तगत केला होता.
अवघ्या काही तासांत घटनेचा तपास केल्याच्या आनंदातून भालेर ग्रामस्थांनी गेल्या आठवड्यात पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढून सत्कार केला. यावेळी भालेर, तिशी, नागांवसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. मिरवणुकीत विद्यार्थिनींनी लेझीम नृत्य सादर केले.
पिस्तूल रोखून मिर्चीची पूड डोळ्यांत टाकत आरोपींनी पैसे कसे लुटून नेले, या घटनेबाबत दोन्ही शेतकऱ्यांनी या कार्यक्रमावेळी माहिती दिली.
यावेळी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदारांचा गौरव करण्यात आला.
भालेरच्या सरपंच शोभा प्रल्हाद पाटील, उपसरपंच गजानन भिका पाटील, नागांवच्या सरपंच रत्नाबाई अधिकार धनगर, तिशीचे सरपंच दिलीप पोपट पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.