Huge response to Shivshahi Mahanatyam
शिवशाही महानाट्याला उदंड प्रतिसाद
Dhule धुळे: येथील एस एस व्ही पी एस महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी सायंकाळी शिवशाही महानाट्याचा शानदार शुभारंभ झाला.
धुळ्यात तीन दिवस हे महानाट्य चालणार आहे. रविवारी पहिला प्रयोग होता.
खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार कुणाल पाटील, डॉ. सुशिल महाजन सपत्नीक उपस्थित होते. तसेच महापौर प्रतिभा चौधरी, युवराज करनकाळ यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
गड-किल्ल्याचा भव्यदिव्य सेट, आकर्षक लाईटस् अन् रुबाबदार साऊंड इफेक्ट्स, कलावंतांचा अस्सल अभिनय, प्रेक्षकांमधून होणारी छत्रपती शिवरायांची एन्ट्री, पारंपारिक वाद्यांचे साऊंडस् आणि पोवाडे या साऱ्यांचा सुयोग्य मेळ साधल्यामुळे आपण शिवरायांच्या ऐतिहासिक राज्यात वास्तव्यास असल्याचा भास होतो आणि आपण छत्रपतींच्या काळाशी एकरुप होऊन जातो. हेच या महानाट्याचे यश आहे. डॉ. सुशिल महाजन यांच्या पुढाकाराने धुळेकरांना शिवरायांचे महानाट्य पहाण्याची पर्वणी लाभली.
चित्रपट आणि टीव्ही मालिकांतील मोठ्या कलाकारांची भूमिका असलेले ‘शिवशाही महानाट्य’ रंगमंचावर सादर होत आहे. या ऐतिहासिक महानाट्यात प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल जिजाऊंची भूमिका साकारत आहेत. धुळ्यातील प्रसिद्ध मेंदू व मणके विकार तज्ज्ञ डॉ. सुशिल महाजन यांच्या पुढाकाराने धुळेकर रसिकांना ही मेजवानी आहे.
धुळे शहरात एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयाच्या प्रांगणात जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनपटावरील विविध महान पैलूंवर प्रकाश टाकणारे महानाट्य २६, २७ आणि २८ मार्च रोजी सादर होत आहे. तमाम रसिक प्रेक्षकवर्ग बसलेल्या मैदानाचाच रंगमंच म्हणून वापर करण्यात आला आहे हे विशेष. जिजाऊ आणि शिवबा असे महान कतृत्व पुन्हा जन्म घेणे शक्य नाही पण त्यांचे कलागूण हे प्रत्येकाच्या अंगाअंगात भिणावे यासाठी तमाम जनतेने हे महानाट्य व त्याचा भव्यदिव्यपणा याची देही याची डोळा जरूर बघावा, असे आवाहन कलावंतांनी केले आहे.
या महांनाट्याचे प्रायोजकत्व डॉ. सुशिल महाजन यांनी केले आहे. संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी लेक अलका कुबल-आठल्ये ह्या तब्बल १८ वर्षानंतर मराठी रंगमंचावर जिजाऊ यांचे कणखर व्यक्तिमत्व साकारणार आहेत. तसेच अखंड महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्या दमदार भूमिकेतून घराघरात पोहचवणारे शंतनू मोघे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दमदार भूमिकेतून छत्रपती बघायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे छत्रपतीचे विविध शिलेदार व मावळे यांचे जिवंत दर्शन महेश कोकाटे, रमेश रोकडे, डॉ. राजेश आहेर, प्रकाश धोत्रे हे घडवणार आहेत. विजय हिरे, अॅड.मयुर बैसाणे, प्रेम सोनार व विशाल चव्हाण यांनी या महानाट्याचे आयोजन केले आहे.
धुळेकरांनी या महानाट्याचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन डॉ. सुशिल महाजन यांनी केले आहे.