Houses were built on the land, the revenue system scrapped it, the Gaudbangal of the revenue journey of the prized land
जागा घेऊन घरे बांधली, महसूल यंत्रणेने ती कागदोपत्री पाडली, इनामी जमिनीच्या महसुली प्रवासाचे गौडबंगाल
Maharashtra News धुळे: शिंदखेडा तालुक्यातील माळीच गावात गावठाण जागेचं मोठं गौडबंगाल सुरू आहे. दहा वर्षांपूर्वी या गावठाण जागेत प्लाॅट खरेदी करुन घरांचे बांधकाम करणाऱ्या ११ कुटूंबांना त्यांच्याच मालकीचे प्लाॅट पुन्हा खरेदी करण्यासाठी दमदाटी केली जात आहे. महसूल प्रशासनातील यंत्रणेचा दुरुपयोग करुन गावातीलच एका भूमाफियाने येथील सामान्य शेतमजूर कुटूंबांवर ही वेळ आणली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
शिंदखेडा तालुक्यात माळीच ग्रामपंचायतीच्या गावठाणातील गट क्रमांक दोन ही ८६ आर जमीन रोहिदास हिरामण माळी यांना उदरनिर्वाहासाठी इनामी मिळाली होती. कालांतराने कर्जबाजारी झालेल्या रोहिदास माळी यांनी गावातील बेघर ११ कुटूंबांना या भूखंडातील काही प्लाॅट विकले. रोहिदास माळी यांच्याकडून ११ जणांनी प्लाॅट खरेदी केले होते. या जागेवर गेल्या दहा वर्षांपासून या कुटूंबांची पक्की घरे आहेत. ग्रामपंचायतीच्या दफ्तरी नमुना नंबर आठमध्ये तशी नोंद असून, आम्ही ग्रामपंचायतीला कर अदा करत असल्याचे या कुटूंबांचे म्हणणे आहे आणि त्यांच्याकडे तशी कागदपत्रेही आहेत. विशेष म्हणजे या ११ पैकी शोभा रमेश पाटील, कविता नाटू पाटील आणि प्रतिभा गणेश पाटील या तिघांनी आपआपल्या प्लाॅटची नियमानुसार पक्की खरेदी केली आहे.
खरी स्टोरी सुरू होते येथून…
११ कुटूंबांना प्लाॅट विक्री केल्यानंतर गट क्रमांक दोनमधील उरलेला भूखंड रोहिदास माळी यांनी लोटन देविदास देसले आणि मुरलीधर देसले यांना विक्री केला. मुरलीधर यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी अनिता, मुलगा हेमंत आणि विशाल हे वारस लागले आहेत. याआधी प्लाॅट खरेदी करणारी ती ११ कुटूंबे आणि मुळ मालक रोहिदास माळी यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत, त्यावेळी पंचायत समिती सदस्य असलेल्या लोटन देसले यांनी सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर करत गट क्रमांक दोन हा संपूर्ण ८६ आर भूखंड खरेदी करुन घेतल्याचे समोर आले आले आहे. धक्कादायक म्हणजे शोभा, कविता आणि प्रतिभा यांनी खरेदी केलेल्या प्लाॅटची ज्या कार्यालयात दस्त नोंदणी झाली त्याच कार्यालयाने पुन्हा त्यांच्या प्लाॅटची लोटन देसले यांच्या नावाने दस्त नोंदणी केली आहे. सोप्या भाषेत एकच प्लाॅट दोन व्यक्तींना खरेदी करुन दिल्याचा प्रताप महसूल यंत्रणेने केला आहे. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे लोटन देसले यांनी हा भूखंड खरेदी करण्याच्या आधी मुळ मालक रोहिदास माळी यांच्या नावे पट भरुन सदर जमीन बिनशेती म्हणजे एन. ए. करून घेतली. एनए करताना त्या जमीनीवरील पक्क्या घरांची अडचण येऊ नये यासाठी महसूल यंत्रणेला हाताशी धरून सदर घरे पाडून टाकल्याच्या नोंदी कागदोपत्री करण्यात आल्या.
परंतु, या भूखंडातील १८ प्लाॅट वगळून उर्वरित जमीन विक्री करण्याचा व्यवहार झाला होता. मग संपूर्ण भूखंड कसा नावे केला हेच कळत नसल्याचे मुळ मालकाचे म्हणणे आहे. तसेच मुळ मालक देखील या कुटूंबांच्या बाजुने ठामपणे उभे आहेत. हा प्लस पॉइंट असला तरी…
आता माळीच येथील गट क्रमांक दोन हा एनए झालेला संपूर्ण भूखंड रितसर लोटन देसले आणि इतर तिघांच्या नावावर झाला आहे. त्या ११ कुटूंबांच्या घरांवरही ते हक्क सांगत आहेत. पुन्हा एक एक लाख रुपये देऊन नव्याने प्लाॅट खरेदीसाठी दबाव आणला जात आहे. घराचे बांधकाम करणाऱ्यांना मारहाण, दमदाटी केली जात आहे. गुन्हे दाखल होऊनही संशयितांना अटक होत नाही. एका प्लाॅटधारकाने सदर भूखंडाची कागदपत्रे मिळविण्यासाठी अर्ज केल्यावर, रेकाॅर्ड जळाल्याचे उत्तर मिळाले आहे. हे प्रकरण म्हणजे महसूलमधील भ्रष्टाचाराचे उत्तम उदाहरण आहे. भूमाफिया, महसूलची यंत्रणा, गुंडगिरी आणि पोलिसांचा धाक अशा चक्रव्यूहात सापडलेल्या या ११ कुटूंबांना न्याय मिळेल तरी कसा, हा प्रश्न आहे.
Gorakh kamade