Ahimsa Run 2023 Three-year-old Ayush ran the marathon
Ahimsa Run 2023 तीन वर्षांचा आयुष धावला मॅरेथॉनमध्ये
Dhule धुळे : भगवान महावीर जयंतीनिमित्त जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनतर्फे धुळे शहरासह देश-विदेशात रविवार, २ एप्रिल 2023 रोजी पहाटे पाच वाजता अहिंसा रन २०२३ मॅरेथॉन स्पर्धा झाली.
धुळे येथील पत्रकार अभिजीत मोहिते, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय एआरटी सेंटर येथील समुपदेशिका प्रतिभा अभिजीत मोहिते यांचा तीन वर्षांचा मुलगा आयुष याने तीन किलोमीटर स्पर्धेमध्ये सहभागी होऊन स्पर्धा यशस्वीरिता पूर्ण केली. त्याबद्दल त्याला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे धुळे महानगरपालिकेच्या महापौर प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन चेअरपर्सन कल्पना सिसोदीया यांच्या प्रमुख उपस्थितीत टीशर्ट, मेडल, कॅप, गुडी बॅग, रिफ्रेशमेंट व ई-प्रमाणपत्र देण्यात आले.
गिनीज वर्ल्ड बुक आणि लिम्का वर्ल्ड बुकमध्ये या मॅरेथॉनची नोंद झाली आहे. अशा ऐतिहासिक अहिंसा रनमध्ये सहभाग घेतलेल्या महिला, पुरुषांसह खेळाडू, विद्यार्थी, मुले सहभागी झाले. मालेगाव रोडवरील श्री अग्रसेन महाराज स्मारकाजवळील गिंदोडीया प्रांगणातून पहाटे ५ वाजता अहिंसा रनला सुरवात झाली. ही मॅरेथॉन ३ किलोमीटर, ५ किलोमीटर, १० किलोमीटर अशी होती. अहिंसा रनचा मार्ग गिंदोडिया कम्पाउंड ते गणपती पॅलेस रोडमार्गे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, आग्रा रोड मार्गे पाचकंदील, महात्मा गांधी स्मारक, पंचवटी, नेहरू चौक, दत्तमंदिर, नगावबारी चौफुली व तेथून त्याच मार्गाने गिंदोडिया कम्पाउंड येथे मॅरेथॉनचा स्पर्धेचा समारोप झाला. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावपटूंना टीशर्ट, मेडल, कॅप, गुडी बॅग, रिफ्रेशमेंट व ई-प्रमाणपत्र देण्यात आले.
महिला समितीचे नियोजन
विशेष म्हणजे धुळे शहराची देश- विदेशात आणखी चांगली ओळख होण्यासाठी या मेगा इव्हेंटची जबाबदारी सांभाळण्याचा मान जैन ऑर्गनायझेशनच्या धुळे शहरातील महिला सदस्यांना मिळाला. त्यात चेअरपर्सन कल्पना सिसोदीया, चीफ सेक्रेटरी स्वाती संघवी, व्हाईस चेअरपर्सन मानसी मुथा, व्हाईस चेअरपर्सन श्वेता बाफना, जॉईन सेक्रेटरी सोनल बरडिया, दीपाली साबद्रा, ट्रेझरर पूजा भन्साली यांनी अहिंसा रन २०२३ ची सर्व जबाबदारी सांभाळली.
देश-विदेशात ४ एप्रिल 2023 रोजी भगवान महावीर यांची जयंती अर्थात भगवान महावीर जन्मकल्याणक साजरा होणार आहे. यानिमित्त अहिंसा, एकता, प्रेम, आदर, शांती तत्त्व तळागाळातील जनमाणसात रूजविण्यासाठी आणि अशी तत्त्वे अंगिकारण्यासाठी एकत्रित येऊन, कृतीतून संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.