The former sarpanch who complained of minor mineral theft was punished
गौण खनिज चोरीची तक्रार करणाऱ्या माजी सरपंचाला केले तडीपार
Dhule Crime धुळे: तालुक्यातील अजंग-कासविहीर शिवारात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गेल्या दोन वर्षांपासून गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू आहे. प्रशासनाची परवानगी न घेता किंवा राॅयल्टी न भरता गौण खनिजाची चोरटी वाहतूक करणाऱ्या गौण खनिज माफियांनी शासनाचा कोट्यावधी रुपये महसूल बुडविल्याचे प्रकरण समोर आले आहे.
याबाबत अजंगचे माजी सरपंच दिनेश माळी, किशोर अहिरे, चेतन गायकवाड, प्रदीप माळी यांनी जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. शिवाय जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुरावे सादर केले आणि महसूलचे पथक चौकशी करण्यासाठी पाठवावे अशी मागणी केली. परंतु प्रशासनाने अजुनपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. दिनेश माळी यांनी पत्रकारांसह घटनास्थळाची पहाणी केली असता अतीशय विदारक चित्र समोर आले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहालगत वसलेल्या अजंग-कासविहीर शिवारातील निसर्ग संपदेचे विकासाच्या नावाखाली प्रचंड नुकसान केले जात आहे.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम, हाॅटेल्स, पेट्रोल पंप आणि कंपन्यांच्या बांधकामासाठी या शिवारातून विनापरवाना गौण खनिजाची चोरटी वाहतूक केली जात आहे. गाळ काढण्याच्या नावाखाली दोन पाझर तलावांमधून मुरूमाचे उत्खनन सुरू आहे. दोन वर्षांमध्ये तलावांना भगदाड पाडल्याने तलावांचे नैसर्गिक पात्र बाधित झाले आहे. एवढेच नव्हे तर खासगी मालकीच्या इनामी जमिनींवरील मोठमोठ्या टेकडी पूर्णपणे पोखरण्यात आल्या आहेत. कोट्यावधी ब्रास गौण खनिजाची चोरी झाली आहे. शासनाचा सुमारे शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल बुडाला आहे.
गौण खनिजाच्या या चोरी प्रकरणी शासनाची बाजु घेत शासनाला सजग करण्यासाठी पुराव्यानिशी लेखी तक्रार करणाऱ्या व्यक्तीलाच आरोपिच्या पिंजऱ्यात उभे करुन महसूल प्रशासनाने दबावतंत्राचा अवलंब केला आहे. जुने गुन्हे बाहेर काढून दिनेश माळी यांना हद्दपार करण्याचे आदेश प्रांत अधिकारी यांनी दिले आहेत. परंतु या दबावतंत्राला आपण घाबरलेलो नाही. कारण महसूल यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हात गौण खनिजाच्या चोरीने बरबटलेले आहेत. त्यामुळे आपली तक्रार कायम आहे. गौण खनिज माफियांसह प्रांत अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे केली आहे. अन्यथा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली जाईल, मंत्रालयासमोर उपोषणाला बसण्याचा आणि हरित लवादाकडे दाद मागण्याचा इशारा दिनेश माळी यांनी दिला आहे.