The lives of young people will not be wasted!
युवक-युवतींच्या आयुष्याची नासाडी खपऊन घेणार नाही!
Dhule धुळे : शहरातील युवक-युवतींच्या आयुष्याची नासाडी खपऊन घेणार नाही. अवैध व्यवसाय करणाऱ्या कॅफेंवर गुन्हा दाखल करावा, अशा सूचना महापौर प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांनी दिल्या.
धुळे शहरातील अनाधिकृत कॅफेमध्ये सुरू असलेल्या अवैध व्यवसाय संदर्भांत महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक घेतली. शहरातील कॅफेमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. महाविद्यालयीन युवक-युवतींना व्यसनाधीन करून भावी पीढिचे आयुष्य उध्वस्त करण्यासाठी असे अवैध कॅफे शहरात व प्रामुख्याने देवपूर भागात सुरू झाले आहेत.आपल्या संस्कृतीला या प्रकाराने गोलबोट लागत असून, अनेक युवती वाममार्गाला लागण्याची शक्यता आहे. अशा अवैध व बेकायदेशीर कृत्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने सदर बैठकीचे आयोजन केले होते.
जयहिंद कॉलनी व देवपूर परिसरात ज्या ठिकाणी अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम करून कॅफे सुरू करण्यात आले आहेत, तसेच मंजूर बांधकाम आराखडा व्यतिरिक्त पार्किंग व प्यासेजच्या जागेत पार्टीशन करून अवैधरित्या बांधकाम केलेले आहे, याची तातडीने पाहणी करून त्या संबंधित प्लॉटधारकांना महाराष्ट्र नगररचना अधिनियमानुसार नोटिस देऊन सदर बांधकामे निष्कासित करणे, त्या प्लॉटधारकांवर गुन्हा दाखल करून सदरचा खर्च त्यांच्यामार्फत वसुल करणे, पोलीस प्रशासनास याबाबत मनपा स्तरावरून लेखी पत्राव्दारे कळविणे इत्यादी बाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसेच यापुर्वी धुळे महानगरपालिकेमार्फत सोना सुपर शॉपसमोरील कॅफे, माहेर हॉस्पिटलसमोरील कॅफे, विक्की कॅफे, आय.आय.टी. कॉलेजसमोरील कॅफे या चार कॅफेवर कार्यवाही करण्यात आलेली आहे. तसेच शनिमंदिराजवळील गटारीच्या कामात अडथळा ठरणारे अतिक्रमण काढणेबाबत अतिक्रमण विभागप्रमुख यांना आदेशित करण्यात आले.
सदर बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असून याबाबत कालमर्यादा निश्चित करून युध्दपातळीवर कार्यवाही करावी व त्याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना महापौर प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांनी संबंधितांना दिल्या.
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, कनिष्ठ अभियंता प्रकाश सोनवणे, मोहनिश पाटील तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.