Journalist Dr. Babasaheb Ambedkar
पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महाराष्ट्रात जशी संतांची परंपरा लाभली आहे तशीच उज्वल पत्रकारितेची परंपरा देखील लाभली आहे. आचार्य अत्रे, आगरकर, नानासाहेब परूळेकर , न.ची. केळकर, खाडीलकर इत्यादी अभ्यासू पत्रकारांनी आपल्या धारदार लेखणीने अनेक प्रश्नांना वाचा फोडली. महाराष्ट्रातला एक चेहरा दिला. या सर्वांसोबत पत्रकारांमध्ये अजून एक नाव होते, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
दीन-दलितांच्या, पीडितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे, महिलांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याचे, सावित्रीबाई आणि तात्यासाहेब महात्मा फुलेंचे शिक्षणाचे कार्य पुढे नेण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. ३१ जानेवारी १९२० रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केले. याच काळात दलित समाजात शिक्षणाचे प्रमाण हजारी ०९ देखील नव्हते. ज्या काळात बाबासाहेबांनी हे पाक्षिक सुरू केले हे फार महत्त्वपूर्ण ठरले. त्यानंतर एप्रिल १९७० ला बहिष्कृत भारत वृत्तपत्र सुरू केले. पांडुरंग नंदराम हे मूकनायकचे संपादक होते. मूकनायकची जेव्हा बाबासाहेबांनी सुरुवात केली तेव्हा सामाजिक वातावरण मुकनायकच्या विरुद्ध होते. त्यामुळे मूकनायक पुढे अडचणीत आले. मुकनायकच्या पहिल्या बारा अंकांचे अग्रलेख लिहिण्याचे पूर्ण काम स्वतः बाबासाहेबांनी केले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांना इंग्लंडला जावे लागले. मूकनायक, बहिष्कृत भारत व्यतिरिक्त प्रबुद्ध भारत, जनता अशी वृत्तपत्रे देखील बाबासाहेबांनी चालवली. मुख्य नायकच्या माध्यमातून कायदा, प्रमाण आणि भावना या तीन वेगवेगळ्या शस्त्रांचा बाबासाहेबांनी चातुर्याने, आपल्या बुद्धी कौशल्याने वापरा केला. बाबासाहेबांनी पत्रकारीतेला नैतिकतेचा पाठीचा कणा मानून पत्रकारिता केली. त्यांचे म्हणणे होते की, पत्रकारिता मनुष्याला निःपक्ष आणि निर्भीड बनवते. आजच्या पत्रकारितेत १०० टक्के नैतिकता राहिलेली नाही असे म्हटले तर वावगे नाही. काही अंशी जे पत्रकार नैतिकतेने चालतात त्यांची वृत्तपत्र तोट्यात चालतात.
पत्रकारिता आणि राजकीय क्षेत्र हे संबंध पाणी आणि माशाप्रमाणे आहेत. जसे पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही तसेच राजकीय श्रेयाशिवाय पत्रकार देखील जगू शकणार नाही. मात्र आजची पत्रकारिता ही राजकारण्यांच्या दावणीला बांधली गेली आहे, अशी टीका केली होऊ लागली आहे. मूकनायकच्या माध्यमातून बाबासाहेबांनी सुरू केलेली पत्रकारिता ही तळागाळातल्या लोकांना, दीन-दलितांना सन्मानाने वागविण्यासाठी समाजास दिशा देणारी होती.
सुरुवातीस ठराविक पत्रकार होते तेव्हा एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद व्हायचा. त्यामुळे एकमेकांवर विश्वास असायचा. स्टींग ऑपरेशन सुरू होताच संवाद संपला आणि विश्वास देखील संपला. वाईट पत्रकारितेने स्वतःचे नाते तयार केले. हुजरेगिरी सुरू झाली. जो वरवर करेल त्यालाच महत्व दिले जाऊ लागले. बाबासाहेबांनी हुजरेगिरीस कधीही थारा दिला नाही. तडजोड स्वीकारली नाही. आज तडजोडी शिवाय पत्रकारिता राहिलेली नाही. म्हणून मला कधी कधी असा प्रश्न पडतो की पत्रकारितेला लोकशाहीचा स्तंभ का मानावे ? कारण आजच्या पत्रकारीतेत नतमस्तक, साष्टांग दंडवत प्रथा सुरू झाली आहे. पत्रकारिता जवळजवळ संपायच्या मार्गावर आहे. अजेंडे ठरलेले आहेत. लोकांनी डीबेट पाहणे सोडावे. कारण तीच तीच माणसं, तेच तेच विषय पाहून नागरिक वैतागले आहेत. बाबासाहेबांनी मूकनायकच्या माध्यमातून कधीही जातीयतेची बीजे पेरण्याचे काम केले नाही. आज काही वृत्तपत्रे व वाहिन्या हे काम करताना दिसून येत आहेत. जाती-पातीची, मुलांच्या भांडणासारखी आजची पत्रकारिता होत आहे. पत्रकारिता आणि राजकीय क्षेत्र हे हातात हात घालून फिरू लागले आहेत. साहजिकच पत्रकार राजकारणाचे बळी पडू लागले आहेत. इच्छा असूनही त्यांना विरोध करता येत नाही. काही इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मीडियातील माध्यमे यांना राजकीय पक्षाचे लेबल लागले आहे. . हे कुठेतरी थांबवले पाहिजे.
पत्रकारिता समाज सजग करण्याचे काम करते, मनोरंजनाचे काम करते. तळागाळातल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पत्रकारीतेमार्फत केले जावे असा अलिखित नियम आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी समाज सजग आणि समृद्ध करण्याचे काम मूकनायकच्या माध्यमातून केले. आज शासकीय जाहिराती मिळवण्यासाठी आणि आपला टी.आर.पी. वाढविण्यासाठी अनेक ठिकाणी पत्रकारीतेचा वापर केला जाऊ लागला आहे. लोकांनी विविध वाहिन्यांवरच्या डिबेट पाहणे देखील बंद केले आहे. जनतेचे प्रश्न मागे पडले आहेत. विरोधात आणि समर्थनार्थ लोकांना आंदोलन करण्यास, त्यांच्या भावना भडकवण्यातच वाहिन्यांचे मालक धन्य समजू लागले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, बहिष्कृत भारतमधून ज्या पद्धतीने पत्रकारिता केली ती पद्धत कालबाह्य होताना दिसून येत आहे आणि हे पत्रकारितेच्या दृष्टीने फार मोठे नुकसान आहे. वास्तविक पाहता मीडियाची वॉच डॉगची भूमिका असणे गरजेचे आहे. पण तसे क्वचितच दिसते.
आजची पत्रकारिता राजकारण्यांच्या दावणीला कशी बांधली गेली त्याची जिवंत उदाहरणं दिल्लीची निवडणूक म्हणावी लागेल. मात्र दिल्लीकरांनी कुणालाही भीक न घालता केजरीवालांच्या पारड्यात मते टाकली. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची माळ केजरीवालांच्या गळ्यात टाकून विश्वास व्यक्त केला आहे. संपूर्ण भारतात केजरीवाल व त्यांच्या ‘आप’ मागे संपूर्ण भारतातील बीजेपी लागली आहे. मात्र ते केजरीवाल यांचा पराभव करू शकले नाहीत. उलट जनतेने पंजाब प्रांत देखील ‘ आप ‘ च्या ताब्यात दिला. भारतीय लोकशाही कार्यपालिका, न्यायपालिका, आणि प्रशासन या तीन खांबावर उभी आहे. आणि तिचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे बघितले जाते. हे तीन स्तंभ लोकशाहीचा गाडा कसा हाकता यावर मीडियाने बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे आणि हेतू देखील तोच आहे. मात्र हल्लीच्या पत्रकारांकडून त्याला कुठेतरी हरताळ फासला जातो आहे. असे असले तरी हल्लीच्या पत्रकारितेच्या अंध युगातही काही किरणे बाकी आहेत. जी किरणे पत्रकारीता जिवंत ठेवण्याचे काम करीत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रेरक आणि डोळस, मार्गदर्शक पत्रकार होते. बाबासाहेबांची पत्रकारिता राष्ट्रनिर्माणासाठी होती. मूकनायक एक आंदोलन होते. समाज बदलण्यासाठी मूकनायकची निर्मिती बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी केली. त्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांचे नाव अग्रेसर असायला हवे होते. मात्र पत्रकार म्हणून मनुवाद्यांनी पत्रकार डॉक्टर बी. आर. आंबेडकर नावाने कधीही कोणत्याही दस्तऐवजात उल्लेख केलेला दिसून येत नाही. विश्व प्रेस मीडियाने केलेल्या सर्वेक्षणात २०१७ साली १८० देशात भारताचे स्थान १३६ क्रमांकावर असल्याचे सांगितले. एक नंबरला नार्वे, दोन नंबरला स्वीडन आहे. जगात सर्वात मोठी लिखित राज्यघटना असूनही भारताचा घसरलेला क्रमांक वर आणण्यासाठी काय उपाययोजना करता येईल हे बघितले गेले पाहिजे. खोट्या बातम्या पसरविण्याचे मुख्य कार्य आपल्याकडे असलेल्या मोबाईल मधील व्हाट्सअप, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया करताना दिसून येते. बाबासाहेबांनी पत्रकारितेला नैतिकतेचा पाठीचा कणा मानला. नैतिकता पत्रकारांना निर्भीड आणि निष्पक्ष बनवते. मुद्दा काहीही असो, त्याची स्पष्टता चौफेर असली पाहिजे. प्रगल्भ बुद्धिमत्ता, झुंजार वृत्तीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायकला ३१ जानेवारी २०२० ला १०० वर्षे पूर्ण झाली. नव्या पिढीने सुरु केलेली पत्रकारिता ही मोठ्या उद्योजकांकडे झुकणारी पत्रकारिता झाली. पत्रकार प्रासंगिक झाले. पहिले संपादकाला प्रचंड महत्व होते. आज उद्योजकाच्या प्रवेशाने संपादकांचे महत्त्व कमी झाले. शासकीय जाहिराती मिळवण्यासाठी हे सर्व सुरू आहे. शासन कोणाचेही असो, कोणत्याही पक्षाचे असो सत्तेत आल्यावर आपला अजेंडा जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी हे काम करतात. चर्चेत आता स्पष्ट प्रश्न विचारले जात नाही. ही देखील एक शोकांतिका आहे.
बाबासाहेबांच्या काळात देखील प्रचंड जातीयता होती. दैनिक केसरीने मूकनायक वृत्तपत्र सुरू झाल्याची साधी बातमी देखील छापली नव्हती. अभिव्यक्तीला विचारमंच देण्याचं काम मूकनायक ने केलेले आहे. वंचित समाजात समाजाला प्रगतीकडे नेण्यासाठी मूकनायकद्वारे बाबासाहेबांनी काम केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारीतेवर पहिले पीएचडी करणारे स्वराज सिंह बेचैन होते. शाहू महाराजांचे स्नेही दत्ता पवार यांनी महाराजांना सांगितले की, डॉक्टर आंबेडकरांना मदत करा. शाहू महाराज स्वतः बाबासाहेबांना भेटावयास गेले.
त्यांनी मूकनायक साठी रुपये २५००/- देऊ केले. तरीही बीबीसी लंडनने मुख्य बातमी छापली. मात्र केसरीने शेवटपर्यंत मुकनायकची बातमी कधीही छापली नाही. बाबासाहेबांनी पैसे देऊ केले पण टिळकांनी जागा नाही असे उत्तर देऊन जेव्हा जागा प्राप्त होईल तेव्हा बातमी छापली जाईल असे सांगितले, मूकनायक बंद झाले तरी केसरीत त्याला जागा मिळाली नाही.
असे असले तरी बाबासाहेबांची पत्रकारिता निर्भीडपणे सुरूच होती. समाजासाठी आपल्या मीडिया मार्फत काही उत्तम संधी द्यावात यासाठी बाबासाहेबांनी पत्रकारीता सुरू केली होती. झुंजार पत्रकारिता हा बाबासाहेबांच्या जीवनाचा आणखी एक पैलू आहे.
– प्रा. मोहन मोरे, धुळे
(लेखक हे पत्रकारिता विषयाचे व्याख्याता आहेत.)