Dr. Babasaheb Ambedkar Jayanti
बाबासाहेबांची जयंती जल्लोषात साजरी | आमदारांनी धरला ठेका | मिरवणुका अन् आतिषबाजी
Dhule धुळे: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती सर्वत्र जल्लोषात साजरी झाली. धुळे शहरात चंदननगरितून निघालेल्या मिरवणुकीत आमदार डॉ. फारुख शाह यांनी भीमगितांवर ठेका धरत निळा झेंडा फडकावला. सत्यशोधक चळवळीचे नेते सिध्दार्थ जगदेव आणि चंदननगर मित्र मंडळाने आकर्षक देखाव्यासज्ह मिरवणूक काढली होती.
साक्री रोडवरील भीमनगरात जोरदार जल्लोष झाला. शहरातील तरुणाईसह महिला, पुरूष अनुयायी हजारोंच्या संख्येने भीमनगरमध्ये बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले होते. तत्पूर्वी तीन दिवस विविध स्पर्धा पार पडल्या. माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली जयंती साजरी झाली.
धुळे शहरात बाबासाहेबांच्या मध्यवर्ती स्मारकाजवळ शहरासह जिल्ह्यातील हजारो अनुयायांनी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत बाबासाहेबांना अभिवादन केले. याठिकाणी आझाद समाज पार्टीने केलेल्या आकर्षक आतिषबाजी आणि रोषणाईने लक्ष वेधून घेतले. पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद लोंढे, शंकर खरात, किरण गायकवाड, नयना दामोदर, विजय सावकारे, अनिल ठाकूर, डॉ. भरत लोंढे, राहूल पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हा उपक्रम घेतला.
बाबासाहेबांच्या स्मारकाच्या चौफेर भीमगितांच्या कार्यक्रमाची पर्वणी होती. युवा दक्ष पत्रकार संघाने ५३२ किलोचा केक कापून जयंती साजरी केली. पत्रकार गौतम पगारे, शशीकांत सरदार, मनोहर वाघ यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
तत्पूर्वी सकाळी विद्यावर्धिनी महाविद्यालयाजवळ रवींद्र दामोदर आणि मित्र परिवाराने शरबत वाटप केले. सायंकाळी पुतळ्याजवळ विद्रोही पत्रकार संघातर्फे पाणी आणि शरबत वाटप करण्यात आले. विविध पक्ष-संघटनांनी अन्नदान केले. राष्ट्रीय दलित पँथरने शरबत वाटप केले. ठिकठिकाणी लागलेल्या पुस्तकांच्या स्टाॅलवर लाखोंची उलाढाल झाली.