Natya Parishad elections chandrashekhar patil press conference
नाट्य परिषदेच्या निवडणुकीला राजकीय रंग
Dhule News धुळे : धुळ्यात रविवार, 16 एप्रिल रोजी होणारऱ्या नाट्य परिषदेच्या निवडणुकीला राजकीय रंग दिला जात असल्याचा आरोप उमेदवार चंद्रशेखर पाटील यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केला.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ सदस्य पदासाठी होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत धुळे शाखेतून ज्येष्ठ नाट्यकर्मी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते चंद्रशेखर उर्फ संजयआबा आत्माराम पाटील हे उमेदवारी करीत आहेत. रविवारी या निवडणूकीसाठी पत्रकार भवन येथे मतदान होणार आहे. या निवडणूकीत चंद्रशेखर पाटील यांच्या विरोधातील उमेदवार यशवंत येवलेकर हे भाजपा या राजकीय पक्षाचे धुळे संघटन सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे नाट्यक्षेत्रात प्रत्यक्ष काहीच योगदान नाही, मात्र तरीही केवळ नाट्यक्षेत्रात लुडबुड करता यावी म्हणून ते निवडणूकीत उभे आहेत. ते आपल्या प्रचाराकरीता भाजपाचा वापर करीत असल्याचा थेट आरोप चंद्रशेखर पाटील यांनी केला.
भाजपाचे काही पदाधिकारी नाट्य परिषदेच्या मतदारांना मोबाईलने संपर्क साधून दिशाभूल करीत चुकीची माहिती देत येवलेकर यांना मतदान करण्याबाबत दबावतंत्राचा वापर करीत आहेत. नाट्य परिषदेच्या या पवित्र अंगणात असा राजकीय हस्तक्षेप अयोग्य व आक्षेपार्हच आहे, असा आरोप उमेदवार चंद्रशेखर पाटील यांनी केला आहे.
प्रतिस्पर्धी उमेदवारास तीन अपत्ये असतील तर,..असा प्रश्न विचारण्यात आला असता ‘तर प्रतिस्पर्धी उमेदवाराची उमेदवारी रद्द होवू शकते’ असे उत्तर चंद्रशेखर पाटील यांनी दिले. ‘एक व्यक्ती एक पद’ अशी शेखी मिरवणाऱ्या भाजपाने येवलेकर यांच्याकडे संघटन सचिव हे पद असताना नाट्य परिषदेच्या निवडणुकीत येवलेकरांसाठी मतदान मागणे हा दुटप्पीपणा पक्षाच्या नियमाविरुध्द नाही का? असा सवालही चंद्रशेखर पाटील यांनी उपस्थित केला आहे.