MNS opposition to Wednesday market of the poor
गरिबांच्या बुध बाजाराला मनसेचा विरोध
maharashtra navnirman sena news धुळे : देवपूर बस स्थानकाजवब दर बुधवारी भरणाऱ्या बुध बाजारात लहानमोठ्यांच्या कपड्यांसह संसारोपयोगी साहित्य परवडणाऱ्या दरात मिळते. त्यामुळे बुध बाजाराची ओळख गरिबांचा बाजार अशी झाली आहे. परंतु भर रस्त्यावर भरणारा हा बाजार अनधिकृत असल्याची तक्रार करीत कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्तांना सोमवारी निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून दर बुधवारी अनधिकृतरित्या कपडा बाजार भरतो. त्या बाजारात तरुणी व महिला वर्गाची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. सदर रस्त्यावरून शाळा, महाविद्यालय, क्लासेसच्या विद्यार्थ्यांची नेहमी वर्दळ असते. परंतु अनधिकृत भरणाऱ्या बाजारामुळे रस्ता बंद होतो आणि गैरसोय होते.
या बाजारातील बरेच विक्रेते प्रत्येक वेळी महिलांसोबत अश्लील वर्तन करताना दिसतात. महिलांना लाज वाटेल असेल हावभाव करतात, असे आमच्या निदर्शनास आले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. त्यातून वादाचे प्रकार देखील उद्भवण्याची शक्यता नाकारू शकत नाही. तसेच तिथे येणारे ग्राहक मिळेल त्या जागी रस्त्यावर वाहने पार्क करतात. जुन्या आग्रा रोडवरून जाणाऱ्या- येणाऱ्या वाहनांना अडथळा होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. त्यातून अनेक वाहनधारकांचे आपसात वाद होतात.
तसेच सध्या साथीच्या रोगांचा फैलाव आणि कोरोना रुग्ण पुन्हा वाढत असून त्या बाजारामुळे धुळे शहरातही कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. धुळे शहर आधीच संवेदनशील आहे. अशातच वरील प्रकार जर वारंवार घडत असेल तर शहराची शांतता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे तात्काळ हा अनधिकृत भरणारा बुध बाजार बंद करावा. अन्यथा येत्या बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच ठिकाणी रास्तारोको आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे.
निवेदन देताना शहराध्यक्ष हर्षल परदेशी, जिल्हा सचिव गौरव गीते, शामक दादाभाई, ओम कासार, शुभम माळी, प्रशांत तनेजा, योगेश जोशी आदी उपस्थित होते.