Five women died in a fire in a candle factory, five lakh each
मेणबत्तीच्या कारखान्यात पाच महिला आगीत होरपळून मेल्या, प्रत्येकी पाच लाखांची मदत
Dhule News धुळे : जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील निजामपूर गावाजवळ असलेल्या मेणबत्तीच्या कारखान्याला भीषण आग लागली असून, पाच मजूर महिलांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये मायलेकीचा समावेश आहे. एक महिलांची प्रकृती गंभीर आहे. १८ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमाराला ही दुर्घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. शासनाने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
मयतांची नावे अशी
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजूर महिला या जैताणे ता. साक्री येथील रहिवासी आहेत. आशाबाई भय्या भागवत (वय ३५ वर्षे), राजश्री भय्या भागवत (१५ वर्षे), नयना संजय माळी आणि सिंधुबाई धुडकू राजपूत अशी मृत महिलांची नावे आहेत. आशाबाई आणि राजश्री या मायलेकी आहेत.
धुळे शहरापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या निजामपूर ता. साक्री गावाजवळ चिपलीपाडा शिवारात हा मेणबत्तीचा कारखाना आहे. वाढदिवस तसेच इतर कार्यक्रमांना लागणाऱ्या आकर्षक मेणबत्ती या कारखान्यात तयार होतात. या कारखान्याला मंगळवारी दुपारी दोन वाजता अचानक आग लागली. आगीत पाच महिलांचा होरपळून मृत्यू झाला. एक महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आग नेमकी कशामुळे लागली याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. शाॅर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान या दुर्घटनेचा जलद गतीने तपास सुरू केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली. तसेच तपासाकरिता एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
दरम्यान, साक्री, धुळे, नंदुरबार येथील अग्नीशमन दलाने तीन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली.
कारखान्यात बालकामगार
याप्रकरणी पंचनाम्याचे काम सुरू असून तपासाअंती नेमका कोणता गुन्हा दाखल होतो हे स्पष्ट होईल. परंतु मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश असल्याने या कारखान्यात बाल कामगार आहेत किंवा कसे याचाही तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणा करीत आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील वासखेडी शिवारातील चमकणारी मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्याला आग लागून पाच महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तीव्र दुःख तसेच मृत, त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदनाही व्यक्त केली आहे. या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत तर जखमींवरील उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या.
त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे दूरध्वनीवरून सात्वंन करून घडलेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनीही घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची माहिती घेऊन पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्यात. तसेच मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सात्वंन केले.