Child marriage stopped in Shirpur, 20 child marriages stopped in Dhule district in six months
शिरपूरला बालविवाह थांबविला, धुळे जिल्ह्यात सहा महिन्यांत रोखले २० बालविवाह
Dhule News धुळे : शिरपूर तालुक्यातील करवंद येथे नियोजित अल्पवयीन मुलीचा विवाह शिरपूर पोलिसांनी वेळीच रोखला. वधू आणि वर पक्षाला समजपत्र देऊन रवाना करण्यात आले. याबाबत पोलीस निरीक्षक आसाराम आगरकर यांनी अधिक माहिती दिली.
शिरपूर शहरातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीचा करवंद येथे १८ एप्रिल रोजी विवाह होता. याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ए. एस. आगरकर यांना मिळाली. त्यांनी स्थानिक पोलिस पाटील यांना घटनास्थळी पाठवले. माहितीची खातरजमा केल्यानंतर महिला कर्मचार्यांसह पोलीस करवंद येथे रवाना झाले. करवंद येथे लग्नाची पूर्ण तयारी करण्यात आली होती. मंडप टाकला असून जेवण तयार केले जात होते. परंतु पोलिसांनी दोन्ही पक्षांना बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असल्याची समज देऊन मुलामुलीसह पोलिस ठाण्यात आणले. त्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम पटवून दिले. उभयंतांच्या आई वडिलांनाही बालविवाह केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतात याबाबत समज देण्यात आली. यापुढे बालविवाह न करण्याबाबत त्यांना समजपत्र देण्यात आले.
दरम्यान, केंद्रशासन पुरस्कृत महिला व बाल विकास मंत्रालय, नवी दिल्ली सहायित सप्तश्रूंगी बहुउद्देशीय महिला संस्थे अंतगर्त चालणार्या चाईल्ड हेल्पलाईन १०९८ क्रमाकांवर जिल्हयात अल्पवयीन बालकांचा बालविवाह होणार असल्याच्या माहितीनुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्डलाईन यांच्या सतर्कंतेने सहा महिन्यात २० बालविवाह रोखण्यात अधिकार्यांना यश आले. बालविवाह होणार आहे याची पूर्व माहिती चाईल्ड लाईनच्या १०९८ हेल्पलाइन क्रमाकांवर मिळताच सदर माहिती बालकल्याण समिती आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाला देण्यात आली. तसेच संबंधित पोलिसांच्या मदतीने एक पथक संबंधित गावात दाखल होऊन, समुपदेशन करून तसेच बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ विषयी माहिती देऊन होणारे बालविवाह थांबविण्यात यश आले. त्यांनतर संबधित गावातील ग्रामपंचायत, शाळा आणि अंगणवाडी केंद्र येथून अल्पवयीन- बालिकेचा वयाचा पुरावा प्राप्त करीत या पुराव्याच्या आधारावर बालिकांचे वय निश्चित करून बालविवाह थांबविण्यात आले. पोलिस विभागाच्या सहकार्याने बालसंरक्षण कक्ष व धुळे चाईल्डलाईन टीमने स्वतः उपस्थित राहून कार्यवाही पार पाडली. अल्पवयीन बालिकेचे व तिच्या पालकांचे समुपदेशन करून मुलाला, मुलीला तसेच त्याच्या पालकांना धुळे बालकल्याण समितीसमोर उपस्थित करण्यात आले. सदर चाईल्डलाईन प्राप्त प्रकरणात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे, संस्था अध्यक्षा मींना भोसले तसेच बालकल्याण समिती अध्यक्षा व सदस्य याचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
साक्री तालुक्यात सर्वाधिक बालविवाह
सहा महिन्यात सर्वात जास्त बालविवाह हे साक्री तालुक्यात रोखण्यात आले. साक्री तालुक्यात नऊ बालविवाह थांबवण्यात आले.
अक्षय तृतीयेला यंत्रणा अलर्ट
जिल्हयात अक्षयतृतीयेच्या दिवशी मोठया प्रमाणावर लग्न समारंभ होतात. त्यामुळे त्यादिवशी असा प्रकार होताना दिसला तर त्वरित चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा महिला बालविकास अधिकारी सचिन शिंदे, चाईल्डलाईन संस्थेच्या अध्यक्षा मीना भोसले यांनी केले आहे. अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर अलर्ट २२ मे रोजी अक्षय तृतीया आहे व हा शुभ मुहूत समजला जातो. या दिवशी अधिकाधिक विवाह होतात. यामध्ये बालविवाहाचे प्रमाणदेखील मोठे आहे. अशावेळी नागरिकांनी दक्ष राहावे. गावात बालविवाह होत असतील तर तात्काळ चाईल्डलाईनच्या १०९८ या क्रमांकावर कॉल करून माहिती द्यावी. सदर माहिती ही पुर्णपणे गोपनीय राहिलं.