Smuggling of liquor from Goa through Dhule to Gujarat state, Police seized liquor stock worth 8.5 lakhs
गोव्याच्या दारूची धुळेमार्गे गुजरात राज्यात तस्करी, पोलिसांनी पकडला सव्वाआठ लाखांचा मद्यसाठा
Dhule Crime धुळे: सॅनिटरी पॅडच्या नावाने होणारी दारूची तस्करी पोलिसांनी गुरुवारी सापळा रचून रोखली. सव्वाआठ लाखांच्या दारूसाठ्यासह १८ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन संशयितांना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गोवा राज्यातील दारू धुळेमार्गे गुजरात राज्यात विक्रीसाठी नेली जात होती. विशेष म्हणजे गुजरातमध्ये दारूबंदी आहे. ट्रक चालकाकडे सॅनिटरी पॅडची बिल्टी होती. या बिल्टीच्या आधारे दारूचीही तस्करी केली जात होती.
उत्तरप्रदेश पासिंगच्या ९३९८ क्रमांकाच्या आयशर ट्रकमधून आर्वी-धुळेमार्गे गुजरात राज्यातील सुरतकडे विनापरवाना मद्यसाठ्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गुरूवारी पहाटे अवधान फाट्यावर सापळा रचला आणि यु. पी. ८०/ एफ. टी. ९३९८ क्रमांकाचा ट्रक अडविला. चालक आणि क्लिनरला चौकशी केली असता, ट्रकमध्ये सॅनिटरी पॅडचा माल असल्याची माहिती दिली. परंतु खबर पक्की असल्याने पोलिसांनी सदर ट्रक पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आणला. त्यातील माल काढायला सुरुवात केल्यावर ट्रकमध्ये एका बाजूला सॅनिटरी पॅडच्या गोण्या होत्या तर आतल्या बाजूला दारूचे खोके होते.
वेगवेगळ्या कंपनीचे देशी-विदेशी दारूचे २०५ खोके, बियरचे २० खोके असा मद्यसाठा आढळून आला. त्याची किंमत आठ लाख २२ हजार ६०० रुपये आहे. मद्यसाठ्यासह १० लाखाचा ट्रक, १२ हजार रुपये किमतीचे सॅनिटरी पॅड, १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण १८ लाख ४४ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच चालक अर्जुन रामजीत बिंदू (वय २४, रा. उत्तरप्रदेश) आणि क्लिनर सोमनाथ नाना कोळी (वय २६, रा. खामखेडा, ता. शिरपूर ) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सदर मद्यसाठा नेमका कोठून आणला आणि हा माल गुजरातमध्ये कोणाला देणार होते, यांचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पीआय हेमंत पाटील, पीएसआय बाळासाहेब सूर्यवंशी, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, हेड कॉन्स्टेबल संतोष हिरे, पोलीस नाईक पंकज खैरमोडे, सपकाळे, योगेश जगताप, किशोर पाटील यांच्या पथकाने केली.