Collector Jalaj Sharma, SDM Pramod Bhamre honored by Chief Minister
जिल्हाधिकारी जलज शर्मा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित
Dhule News धुळे : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात सर्वोत्कृष्ट उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे ने भूसंपादन प्रक्रियेत महाराष्ट्र रिमोट सेन्सींग ॲप्लीकेशन सेंटर, नागपूर यांचेकडून प्राप्त उपग्रह छायाचित्रांचा वापर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जलज शर्मा, शिरपूरचे प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांना सन्मानित करण्यात आले.
नागरी सेवा दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे आज झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी शर्मा यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते 50 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक आदि यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरीता तसेच सर्वाच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याकरीता राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्ध राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे यांनी भूसंपादन प्रक्रियेत महाराष्ट्र रिमोट सेन्सींग ॲप्लीकेशन सेंटर, नागपूर यांचेकडून प्राप्त उपग्रह छायाचित्रांचा वापर करण्यात प्रथम क्रमांक मिळविलाबद्दल सन्मानित करण्यात आले.