Split in Mahavikas Aghadi, ShivSena out of market committee election panel
महाविकास आघाडीत फुट, मार्केट कमिटी निवडणुकीच्या पॅनलमधून शिवसेना बाहेर
Political News धुळे : जिल्ह्यात महाविकास आघाडीत फुट पडली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने शिवसेनेला (उबाठा) जागा न दिल्याने महाविकास आघाडीच्या पॅनलशी आमचा आता संबंध नाही, असे स्पष्ट करत पॅनलमधून बाहेर पडत असल्याचे शिवसेनेने जाहिर केले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.
शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकानुसार, मार्केट कमिटी ही शेतकरी, शेतमजूर, व्यापारी या कष्टकरींची संस्था आहे. मार्केट कमिटीतील कारभारावर अंकुश रहावा म्हणून प्रतिनिधित्व स्वरूपात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळावी, अशी माफक अपेक्षा महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख आमदार कुणाल पाटील यांच्याकडे शिवसेनेने व्यक्त केली होती . या संदर्भात शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार अशोक धात्रक यांनी देखील आमदार कुणाल पाटील यांच्याशी चर्चा केली होती. चर्चे दरम्यान आमदार कुणाल पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद शही दिला होता.
परंतु उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी त्यांनी ऐनवेळी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना अर्ज मागे घ्यावे लागले. याबाबत आमदार पाटील यांच्या भूमिकेचा व पॅनल निर्मिती करणाऱ्या प्रक्रियेचा शिवसेनेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. तसेच धुळे ग्रामीण मतदारसंघातील शिवसैनिक, शिवसेना पदाधिकारी पक्ष नेतृत्वासोबत असून शिवसेना पक्षाला महाविकास आघाडीतील मित्र पक्ष अशा पध्दतीने वागणूक देत असतील तर शिवसैनिक आगामी काळात येणाऱ्या परिस्थितीला हाताळण्यास सर्मथ आहेत. महाविकास आघाडीत शिवसेना शब्दाला जागणारा पक्ष आहे. मार्केट कमिटीत शेतकरी बांधवांच्या प्रश्नावर शिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला वेळोवेळी धाऊन गेली आहे. अनेकवेळा शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला शिवसेनेने वाचा फोडली आहे.
आगामी काळात शेतकरी हितासाठीच शिवसेना नेहमी कार्यरत राहणार असून, शिवसेनाचा मार्केट कमिटीत सदस्य असला किंवा नसला तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावरची लढाई लढायला शिवसेना शिवसैनिकांसोबत सज्ज आहे. महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये शिवसैनिकांना संधी दिली नाही तरी मार्केट कमिटीत शेतकऱ्यांच्या महाविकास आघाडीच्या पॅनलला आमच्या शुभेच्छा आहेत. आम्ही आघाडीसोबतच आहोत. मार्केट कमिटीत शेतकरी हितासाठी शिवसेना अंकुश ठेवण्याचा निश्चितच प्रयत्न करेल, अशा आशयाचे पत्रक शिवसेना सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांनी काढले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असताना महाविकास आघाडीत पडलेली फुट विरोधकांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जाणकारांचे मत आहे.